पालिकेच्या नव्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या प्रयत्न; सुरक्षारक्षकांनी वेळीच
By पंकज पाटील | Published: March 2, 2023 07:26 PM2023-03-02T19:26:18+5:302023-03-02T19:27:19+5:30
आज दुपारच्या सुमारास एका महिलेने अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेचा सुरक्षा रक्षकांनी वेळीच त्या महिलेला अडवल्याने मोठा अनर्थ टळला.
अंबरनाथ- आज दुपारच्या सुमारास एका महिलेने अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेचा सुरक्षा रक्षकांनी वेळीच त्या महिलेला अडवल्याने मोठा अनर्थ टळला.
अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्व कामकाज गेल्यानंतर ही इमारत मंत्रालयाच्या इमारतीप्रमाणेच सर्वसामान्य आणि त्रस्त नागरिकांसाठी जीवघेणी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्रस्त झालेले नागरिक प्रशासनाला घाबरवण्यासाठी या इमारतीवरून उडी मारण्याची शक्यता या आधीच वर्तवण्यात येत होती. प्रशासनाला देखील ज्या गोष्टीची भीती होती तोच प्रकार बुधवारी दुपारी घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. एक महिला नोकरी मिळवण्यासाठी पालिका कार्यालयात आली होती.
या महिलेचे आपल्या पती बरोबर जमत नसल्याने आणि तिच्या पतीने दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यास नकार दिल्याने ही महिला आर्थिक विवंचनेत सापडली होती. तसेच त्या महिलेचे सर्व कागदपत्र देखील तिच्या नवऱ्याने जाळल्याने तिला नोकरी मिळणे देखील अवघड जात होते. या महिलेने पूर्वी नर्स म्हणून रुग्णालयामध्ये काम देखील केले होते.
मात्र आता नोकरी नसल्यामुळे तिच्या समोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला होता. बुधवारी नोकरीच्या शोधात ही महिला पालिका कार्यालयात आली, मात्र तिला कोणत्याही अधिकाऱ्यांनी योग्य उत्तर न दिल्यामुळे ती त्रस्त झाली आणि पालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरून तिने सुरुवातीला आपल्या पायातील चप्पल आणि हातातील पर्स खाली फेकली. हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येतात त्यांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली आणि त्या महिलेने उडी मारण्याच्या आधीच तिला पकडले. त्यानंतर त्या महिलेला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.