जन्मठेप झालेल्या कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: July 27, 2015 01:13 AM2015-07-27T01:13:16+5:302015-07-27T01:13:16+5:30
एका खून प्रकरणात न्यायालयाने दोन आठवड्यांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या रामू पवार या कैद्याने ठाणे कारागृहातच गळफास
ठाणे : एका खून प्रकरणात न्यायालयाने दोन आठवड्यांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या रामू पवार या कैद्याने ठाणे कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ठाणे मध्यवर्ती कारागृहात शनिवारी घडली. आता दुसऱ्याच्या खुनाबरोबरच स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर आणखी एक गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
रामू गेल्या तीन वर्षांपासून ठाणे कारागृहात न्यायालयीन बंदी आहे. दोन आठवड्यांपूर्वी न्यायालयाने त्याला खून प्रकरणी २० वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे त्याला नाशिकच्या कारागृहात हलविण्याची प्रक्रियाही सुरू झाली. जन्मठेपेच्या शिक्षेमुळे मानसिक तणावाखाली त्याने शनिवारी सकाळी १०.३० वा.च्या सुमारास कारागृहातील बरॅक क्र. ६ च्या भिंतीच्या पाठीमागील झाडावर चढून चादरीच्या साहाय्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार काही कैद्यांच्या तसेच तुरुंग अधिकारी विशाल बांदल यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याची सुटका केली. त्याच्यावर कारागृहातीलच डॉ. धोतरे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी त्याला दाखल केले.