नेत्यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न
By admin | Published: December 9, 2015 12:47 AM2015-12-09T00:47:25+5:302015-12-09T00:47:25+5:30
शहरात विविध मार्गांवर ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) आणि एसटीच्या मार्गांवरुन बिनधास्तपणे प्रवासी घेणाऱ्या कथीत राजकीय नेत्यांच्या मालकीच्या खासगी बसवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे
जितेंद्र कालेकर, ठाणे
शहरात विविध मार्गांवर ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) आणि एसटीच्या मार्गांवरुन बिनधास्तपणे प्रवासी घेणाऱ्या कथीत राजकीय नेत्यांच्या मालकीच्या खासगी बसवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. यानुसार दररोजचे रोकडा उत्पन्न देणाऱ्या या बसेसचा परवाना निलंंबित करण्याचा प्रस्तावच ठाणे पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवून या नेत्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्याच्या घोडबंदर रोड, कोपरी, कॅडबरी, माजीवडा, मानपाडा, पातलीपाडा, ब्रम्हांड, डोंगरीपाडा , काजूपाडा, वाघबिळ ते गायमुखपर्यंतच्या मार्गांवर या बसेस चालविल्या जात आहेत. शहरात सोसायटी किंवा कंपनीच्या नावाखाली अशा ८० बसेसकडून टीएमटी आणि एसटी तिकीटापेक्षा अल्पदरात त्या सेवा देत आहेत. यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवेतील एसटी, टीएमटीचे उत्पन्न एकीकडे बुडत असून दुसरीकडे या मार्गंवर मोठया प्रमाणात वाहतूककोंडीही होत आहे. काही चालक तर १० ट्रीप मारल्यानंतर ११ व्या फेरीचे पैसे स्वत:च्या खिशात टाकत असल्याचवाही आरोप आहे. यामुळे मालकांप्रमाणे चालकांचाही माध्यमातून मोठा गल्ला जमा होतो. दिवसाला या वाहतुकीमुळे टीएमटीला हजारो तर महिन्याला लाखोंचा फटका सहन करावा लागत आहे.
गेल्या वर्षभरात ठाणे शहर वाहतूक शाखेने जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंत सात हजार १०० कारवाया केल्या आहेत. तर डिसेंबर च्या सात दिवसात ३६१ केसेस नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली.यामध्ये परवाना नसतांना, उड्डाणपुलाजवळ, टीएमटी आणि एसटीच्या बस थांब्यावरुन प्रवासी घेण्याच्या कारणावरुन या कारवाया केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त पुलकेशी मठाधिकारी यांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या या कारवायांपासून काहीसा दिलासा मिळावा यासाठी या बस चालकांचे एक शिष्टमंडळ ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना मंगळवारी भेटले. त्यावेळी त्यांनी अशा टप्पा वाहतुकीसाठी खासगी बस चालकांना पोलिसांनी सहकार्य करण्याची भाषा केल्यावर लक्ष्मीनारायण त्यांच्यावर कमालीचे संतापले. कोणत्याही बेकायदेशीर कामाची माझ्याकडून अपेक्षा करु नका. या देशावर प्रेम असेल तर तुम्हीही असे काम करु नका, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक कराल, तर पोलीस कारवाई करुच शिवाय परवाने निलंबितही केले जातील, ते रद्द करण्यासाठीही शिफारस केली जाईल, असेही त्यांनी या शिष्टमंडळाला सुनावले.
त्यामुळे यापुढे जादा प्रवासी घेणारे, परवान्याच्या नियमांचे उल्लंघन करणारे, वाहतुकीस अडथळा करणाऱ्या तसेच टीएमटीच्या थांब्यावरुन प्रवासी उचलून टप्पा वाहतूक करणाऱ्या बस आणि त्यांच्या चालकांवर परवाना निलंबन तसेच तो रद्द करण्याचाही प्रस्ताव आरटीओकडे पाठविला जाणार असल्याचे लक्ष्मीनारायण म्हणाले.
या बस चालकांनी सोसायटी किंवा कंपनीच्या कराराप्रमाणे प्रवासी न घेतल्यास अन्य बेकायदेशीर वाहतूक केल्यास त्यांच्यावर ही कारवाई केली जाणार आहे. यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी सुनावले.
> पोलीस तसेच आरटीओने या बसेसवर खटले भरल्यानंतर ते न्यायालयात दंड भरुन पुन्हा रस्त्यावर येतात. तसेच खासगी बस चालकाने पहिला गुन्हा केल्यास त्याचा परवाना दहा दिवसांसाठी, दुसऱ्या गुन्ह्याला २० तर तिसऱ्या गुन्हयाला ३० दिवसांसाठी निलंबित करण्यात येतो, अशी माहिती आरटीओच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली. खासगी बसेसवर कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारला आहे. मात्र, टीएमटी आणि एसटीनेही त्यांची सेवा जलद, तत्पर दिली पाहिजे. टीएमटीने त्यांच्या बसेसची संख्या वाढवून प्रवाशांना वेळेत सेवा दिली पाहिजे, अशी अपेक्षाही प्रवासी आणि पोलिसांनी व्यक्त केली आहे.या बसमुळे कोपरीसह घोडबंदर भागात होणाऱ्या वाहतूककोंडीच्या वाढत्या तक्रारी आल्यानंतर विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी अशा सर्व बसवर कारवाई करून तत्काळ परवाने रद्द करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, थातूरमातून कारवाई वगळता ठाणे वाहतूक पोलीस आणि आरटीओने पुढे काहीच केले नसल्याचा ईतिहास आहे.
यापैकी अनेक बसमध्ये शहरातील काही राजकीय नेत्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले नसल्याने पोलीस आणि आरटीओची ती मोहिम थंडावल्याची चर्चा आहे.