पोलिसांवर गाडी नेण्याचा प्रयत्न; वकिलाच्या मुलास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:52 PM2018-12-10T22:52:38+5:302018-12-10T22:53:07+5:30
सिग्नल तोडून वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल अजित खैरमोडे यांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य फड (१८) या तरुणाला नौपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली.
ठाणे : सिग्नल तोडून वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल अजित खैरमोडे यांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य फड (१८) या तरुणाला नौपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. ठाण्याच्या माजी जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांचा तो मुलगा आहे.
९ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वा. च्या सुमारास आदित्य त्याच्या काळी फिल्म असलेल्या कारने मल्हार सिनेमाकडून तीन हात नाक्याच्या दिशेने सिग्नल तोडून येत होता. नाशिक मुंबई वाहिनीवरील सिग्नल तोडल्यानंतर त्याची कार हरिनिवासकडे येणाºया सिग्नलकडे थांबली. त्यावेळी त्याच्याकडे नौपाडा वाहतूक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल खैरमोडे यांनी चालक अनुज्ञप्तीची (लायसन्स) मागणी केली. त्याने अरेरावीची भाषा करीत लायसन्स नाही, असते तर दिले असते, आई वकील असल्याने पोलीस काही करु शकत नसल्याचेही त्याने सुनावले. त्यानंतर त्याने कार रेस करुन त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कॉन्स्टेबल हारुगले आणि थोरवे यांनी तिथे धाव घेतली. त्याला थांबण्याचा इशारा करुनही त्याने त्यांच्याही अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्निल भामरे यांच्या पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने नितिन कंपनीकडे पलायन केले. त्यावेळी खैरमोडे यांच्या डाव्या हाताच्या एका बोटालाही मार लागला. गाडी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी धर्मवीरनगर सेवा रस्त्यावरुन आदित्यला ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.