प्रदूषणकारी ८९ कंपन्यांची नावे दडवण्याचा प्रयत्न?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:16 AM2019-12-20T00:16:14+5:302019-12-20T00:17:56+5:30
राजू नलावडे यांची टीका : माहितीच्या अधिकारात दिला तपशील
डोंबिवली : गेल्या काही दिवसांत प्रदूषणाच्या तक्रारींत वाढ झाल्याने नेमक्या किती व कोणत्या प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे, याची आकडेवारी माहिती अधिकारात माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते राजू नलावडे यांनी विचारली होती. मात्र, ही माहिती देण्यास मंडळ टाळाटाळ करीत असल्याचा व ती त्रोटक देत असल्याची टीका नलावडे यांनी केली.
१ एप्रिल २०१६ पासून प्रदूषण करणाºया किती कंपन्या बंद करण्यात आल्या व त्यांची नावे द्या, असा तपशील नलावडे यांनी १३ नोव्हेंबरला माहिती अधिकारात विचारला होता. त्यानुसार, महिन्यानंतर मंडळाने दिलेल्या उत्तरात एप्रिल २०१६ पासून आतापर्यंत प्रदूषण करणारे ८९ कारखाने बंद करण्याच्या नोटिसा दिल्या असल्याची माहिती दिली आहे. मात्र, त्या कंपन्यांची नावे मागूनही ती दिली नसल्याचा आरोप नलावडे यांनी केला. त्यामुळे खरेच त्या बंद केल्या की नाही, हे समजत नसून शोध तरी कसा घ्यायचा, असा सवाल त्यांनी केला.
डोंबिवलीतील अतिप्रदूषित, प्रदूषण करणाºया कंपन्या कोणत्या आहेत, यावर अशी माहिती जतन केली जात नाही, असेही उत्तर देण्यात आल्याचे ते म्हणाले.
देशातील प्रदूषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील सहा शहरे असून त्यात डोंबिवलीचा समावेश आहे. डोंबिवलीचा सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण दर्शक ६९.६७ एवढा आहे. साधारण तसे दर्शक प्रमाण ६० वरील असल्यास ते शहर चिंताजनक पातळीवर असल्याचे प्रमाण मानले जाते. डोंबिवलीतील हवा आणि पाणी याचेही प्रदूषण प्रमाण अनुक्रमे ६२ व ६३.५ इतके आहे. डोंबिवलीचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.
डोंबिवलीतील प्रदूषण वाढण्याला औद्योगिक कारखाने, शहरातील बांधकामे, वाहतूककोंडी, अस्वच्छता इत्यादी अनेक कारणे असू शकतात, असेही नलावडे यांनी सांगितले. दरम्यान, मंडळाने नोटीस बजावलेल्या कंपन्यांची नावे न दिल्याने एमआयडीसीतील कंपन्यांवरील कारवाईमध्ये पारदर्शक कारभार होत नसल्याची टीका त्यांनी केली.
माझ्या माहितीनुसार मुळात माहिती अधिकारात प्रश्नार्थक माहिती मागू नये. पण असे असतानाही राजू नलावडे यांनी जे प्रश्न विचारले, त्यानुसार प्रदूषण करणाºया किती कंपन्यांवर कारवाई केली, तो आकडा देण्यात आला आहे, त्यांनी मागितलेली सर्व माहिती मंडळाने दिली आहे.
- संजय भोसले, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी