राया येथील इजतेमात 55 हजार मुस्लीम बांधवांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 05:32 PM2017-12-24T17:32:03+5:302017-12-24T17:32:25+5:30
कल्याण - टिटवाळा-खडवली दरम्यान असलेल्या राया गावात कालपासून मुस्लिम बांधवांचा धार्मिक इजतेमा सुरु आहे. या इजतेमासाठी राज्यभरातील 28 जिल्ह्यातून 55 हजार मुस्लिम बांधव दाखल झालेले आहे. 40 एकर जागेत भव्य मंडपात धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम सुरु आहे. त्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
राया गावात कोकणी मुस्लिमांची वस्ती आहे. राया गावात जवळपास 500 घरे मुस्लीम बांधवांची आहे. या छोटय़ाशा गावात हा मोठा धार्मिक कार्यक्रम कालपासून सुरु झाला आहे. त्याचा आज रविवारचा दुसरा दिवस होता. उद्या सोमवार्पयत हा कार्यक्रम सुरु राहणार आहे. उद्याचा दिवशी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. 40 एकर जागेवर भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. राज्यभरातील 28 जिल्ह्यातून मुस्लिम बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. दर दिवसाला सव्वा तास ते अडीच तासाची जवळपास तीन प्रवचने होत आहे. इजतेमात सहभागी झालेल्या 55 हजार मुस्लिम बांधवांच्या खाण्याची व पिण्याची पाण्याची चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यांच्या प्रसाधानगृहाची सोय करण्यात आलेली आहे. त्यांच्या विश्रंतीसाठी कक्ष उभारण्यात आलेले आहेत. दिवसाला दोन वेळा बिर्याणीचे जेवण दिले जाते आहे. त्यासाठी भले मोठे आठ काऊंटर ठेवले आहेत. एका काऊंटरला एका वेळच्या जेवणासाठी 800 किलो बिर्याणी शिजविली जात आहे. शुरा जमात ही 80 वर्षापासून कार्यरत आहे. शुरा जमातीच्या वतीने हा इजतेमा आयोजित करण्यात आला आहे. इजतेमात सहभागी होणारा प्रत्येक मुस्लीम बांधव स्वखर्चातून येतो. त्याच्याकडून राहण्यासाठी व जेवणाची सोय अल्पदरात उपलब्ध करुन दिली जाते. जगात जगत असताना धर्माची शिकवण काय आहे. आपण जगात जन्माला कशासाठी आलो. चांगले कर्म केले नाही तर मृत्यूपश्चात त्याचा हिशोब द्यावा लागतो. या गोष्टीवर भर देणारी प्रवचने मुल्ला मौलवींच्या माध्यमातून दिली जात आहे. जगाची निर्मिती एकाच देवाने केलेली आहे. तो सगळ्य़ांना प्रिय असला पाहिजे यावर इजतेमात अधिक भर दिला जातो अशी माहिती शुरा जमातीचे फैय्याज परकार यांनी दिली आहे. अब्दुल्ला कुंगले, अब्दुल वाहिद दिवाण, मौलना उमेद, शागोफ गोरे यांनी या उपक्रमाच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली असून इजतेमा आयोजनासाठी रस्ते व दिवाबत्तीची सोय भाजप आमदार किसन कथोरे यांनी उपलब्ध करुन दिल्याने आयोजन करणो सोयीचे झाल्याची माहिती परकार यांनी दिली आहे.