‘ओ शेठ...’ गाण्यातून वेधले खड्ड्यांकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:43 AM2021-09-18T04:43:08+5:302021-09-18T04:43:08+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : बदलापुरातील उड्डाणपुलाच्या दुरवस्थेबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून उपरोधिक पोस्ट करून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : बदलापुरातील उड्डाणपुलाच्या दुरवस्थेबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून उपरोधिक पोस्ट करून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. असे असताना आता राष्ट्रवादीने मोबाइलवर ‘ओ शेठ... तुम्ही नादच केलाय थेट’ हे गाणे वाजवून, तसेच बॅनर झळकवून नगर अभियंत्यांचे खड्डेमय रस्त्याबद्दल उपरोधिकपणे जाहीर अभिनंदन करीत अनोखे आंदोलन केले.
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले. निकृष्ट दर्जाचे डांबर व साहित्य वापरून खड्डे भरण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी निवेदनाद्वारे केला आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अभियंते, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ऐन गणेशोत्सवात बदलापूरच्या एकमेव उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. यामुळे त्रस्त नागरिक सोशल मीडियावर उपरोधिक पोस्ट टाकून संताप व्यक्त करीत आहेत. मात्र, त्यानंतरही पालिका प्रशासनाकडून रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे पालिका प्रशासनापर्यंत नागरिकांच्या भावना पोहोचविण्यासाठी हे आंदोलन केल्याचे अविनाश देशमुख यांनी सांगितले. मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी या आंदोलनाची दखल घेऊन याप्रकरणी चौकशी करण्याचे, तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते खड्डेमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
आंदाेलकांना अटक व सुटका
अविनाश देशमुख यांच्यासह आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना बदलापूर पूर्व पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली. या आंदोलनात विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, डॉक्टर सेलचे जिल्हा सरचिटणीस डॉ. अमित गोइलकर, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष संजय कराळे, प्रीतम वानखडे, शंकर चौरे, अरबाज कुरेशी, सिद्धार्थ अंगुरे आदी सहभागी झाले होते.
--------------------