‘सिंघानिया’च्या दिमाखदार सोहळ्याने उपस्थित मंत्रमुग्ध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:34 AM2019-06-07T00:34:59+5:302019-06-07T00:35:09+5:30
सुनीतीदेवी सिंघानिया शाळेचे उद्घाटन : विद्यार्थ्यांसह पालकांनाही आवरला नाही फोटोसेशनचा मोह
ठाणे : ठाणे शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवलेल्या सुनीतीदेवी सिंघानिया शाळेचा लोकार्पण सोहळा गुरुवारी अतिशय उत्साहात आणि तितक्याच शिस्तबद्धरीतीने साजरा झाला. यावेळी शाळेतील मुलांसह आयोजकांकडून येणाऱ्या प्रत्येकाचे आदरातिथ्य करण्यात आले. त्यामुळे या सोहळ्याने एक वेगळीच उंची गाठली होती. यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे, त्यांच्यासह त्यांच्या पालकांनाही या शाळेचे फोटोशूट, शूटिंग आणि सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
ठाण्यामध्ये श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया ट्रस्टअंतर्गत श्रीमती सुनीतीदेवी सिंघानिया ही नवीन शाळा सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी तिचा उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महापौर मीनाक्षी शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, रेमण्ड लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, त्यांच्या पत्नी नवाज सिंघानिया, स्नेही कल्पना सिंघानिया, अभिनेता गुलशन ग्रोवर, शाळेच्या प्रिन्सिपल तथा डायरेक्टर एज्युकेशन रेवती श्रीनिवासन, व्हाइस प्रिन्सिपल कॅबरॉल ग्लॅडिस, वरिष्ठ व्यवस्थापक मनीष नार्वेकर यांच्यासह रेमण्डसमूहाचे प्रेसिडेंट (कमर्शिअल) एस.एल. पोखरणा, व्हाइस प्रेसिडेंट (कॉर्पोरेट अफेअर्स) संजीव सरीन, डायरेक्टर (प्रोजेक्ट) संदीप महेश्वरी, सीईओ (लाइफस्टाइल बिजनेस) संजय बहेल, प्रेसिडेंट (ग्रुप अॅप्पारेल) गौरव महाजन, प्रेसिडेंट (एच.आर.) के.ए. नारायण, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल, निवासी जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नियोजित वेळेत झाली. मुख्यमंत्र्यांसह इतर पाहुण्यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर त्यांचा स्वागत सोहळा पार पडला. यावेळी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून किंडरझोनच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना वृक्षांचे आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या सोहळ्याला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले. यावेळी गौतम सिंघानिया यांनी या शाळेचे स्वप्न कसे साकार झाले, याची माहिती उपस्थितांना दिली. शाळेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी घडवण्याचे स्वप्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दहा महिन्यांपूर्वी या शाळेचे भूमिपूजन करण्यात आले होते. निर्धारित कालावधीत ही शाळा सुरू करण्यात त्यांना यश आल्याने त्याबद्दल मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम् हे गीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी सादर केले. आलेल्या प्रत्येक अतिथीचे यावेळी स्वागत करण्यात आले. दरम्यान, या शाळेत नर्सरी ते सहावीपर्यंत एकूण १५०० विद्यार्थी असणार आहेत. वर्गातील शिकवणे जास्तीतजास्त अर्थपूर्ण व मुलांना सक्षम करणारे असावे, यासाठी शाळेने प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक नेमले आहेत. मजेशीर शिक्षणप्रक्रिया, अत्याधुनिक ग्रंथालये, विज्ञान प्रयोगशाळा, स्मार्ट इंटरअॅक्टिव्ह बोर्ड्स, संगणक, प्रयोगशाळा, अॅक्टिव्हिटी रूम्स अशी सगळीच यंत्रणा सज्ज झाल्याने ती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची कार्यक्रमानंतर एकच झुंबड उडाली होती. यावेळी कुणी शाळेचा झगमगाट दंग होऊन पाहत होते, तर कुणी उत्साहात फोटोसेशन करत होते, कुणी सेल्फी काढण्यात, तर कुणी व्हिडीओ शूटिंग करण्यात मग्न असल्याचे दिसून आले.