बाहुबली, हॉर्स सन मखरांचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 01:26 AM2020-08-11T01:26:47+5:302020-08-11T01:26:50+5:30
दिव्यांग आदिवासी मुलांची कला; १०० विविध प्रकारांत उपलब्ध
ठाणे : गणेशोत्सवाचे दिवस जवळ येत आहेत. यंदा कोरोनाचे सावट असले, तरी योग्य ती काळजी घेत गणेशभक्त तयारीला लागले आहेत. मूर्तींबरोबर सजावटीसाठी लागणारे आकर्षक मखरही ठाण्यात उपलब्ध आहेत. यंदा गणेशभक्तांसाठी हॉर्स सन आणि बाहुबली मखर नव्याने आले आहेत. वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून हॉर्स सन या मखराला ठाणेकर भक्तांची अधिक पसंती आहे. विशेष म्हणजे पुण्यातील दिव्यांग आदिवासी मुलांनी बनविलेले मखर यंदाचे आकर्षण ठरत आहेत.
अवघ्या दोन आठवड्यांवर गणेशोत्सव आला आहे. कोरोनाच्या सावटाखाली साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचा निश्चय ठाणेकरांनी केला आहे. मूर्तिकार यंदा मर्यादित मूर्ती घडवित आहेत. उत्सवाचे आकर्षण वाढविणारे मखर यंदा बाजारात आले आहेत. ठाण्यात ओम गणेश आर्टतर्फे मखर प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न म्हणून क्रिएटिव्ह पीपल्स संस्थेच्या आदिवासी व वंचित दिव्यांग मुलांनी बनवलेले आकर्षक मखर यात आहे. ठाण्यातील गणेशभक्तांनी या मुलांचे कौतुक म्हणून त्यांनी बनविलेल्या मखरांनादेखील पसंती दिली आहे. वास्तुशास्त्रात सात घोड्यांना महत्त्व असते म्हणून सात घोडे आणि सूर्यमुख दाखविणारे मखर ठाणेकरांच्या पसंतीस पडल्याने सर्वाधिक मागणी या मखराला असल्याचे आयोजक प्रीतेश तावडे यांनी सांगितले. तसेच, लाकडापासून हे मखर बनविले असल्याने चार ते पाच वर्षे टिकते, या हेतूनेदेखील या मखराला पसंती मिळत आहे. ६२०० रुपये ते १२ हजार रुपयांपर्यंत या मखराची किंमत आहे.
इको-फ्रेण्डली मखरांना पसंती
कागदापासून बनविलेले बाहुबली मखरदेखील यंदा आकर्षण ठरत आहे. त्याचप्रमाणे मोरेश्वर, वरद विनायक, कुटीर, कापडी मखर, कागदामध्ये मेघडंबरी, सुवर्णासन, देवघर, पितांबर, गोवर्धन, चटईमध्ये कमळ, गणेशरथ, राजगादी, गजानन आसन, मोरपंख, सूर्यमुखी, राजमहल, महल, गणेशमहल, साई आसन, हवा महल, वनराई, मोरपिसारा यासारखे १०० हून अधिक प्रकार पाहायला मिळत आहे. हे इको-फ्रेण्डली मखर कापड, चटई, बांबू, कागद, लाकूड यापासून बनविले आहे. आदिवासी दिव्यांग मुलांचे मोर, मोरपिसारा, कमळ, मोरपंख हे मखरदेखील आहेत. ही सर्व मखरे १० इंच ते चार फुटांपर्यंत बनविण्यात आली आहेत.
मखर खरेदीसाठी येणाऱ्याला सोशल डिस्टन्सिंंग पाळा, सॅनिटायझर वापरा, मास्क लावा आदी नियमांचे पोस्टर्स लावले आहेत.
- प्रीतेश तावडे, आयोजक