‘रेरा’अंतर्गत जप्त केलेल्या मालमतेचा उद्या लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:25 AM2019-01-20T01:25:33+5:302019-01-20T01:25:35+5:30
‘रेरा’ कायद्यांतर्गत जप्त केलेल्या कल्याणमधील आंबिवली येथील बांधकाम प्रकल्पातील मालमत्तेचा सोमवारी लिलाव करण्यात येणार आहे.
टिटवाळा : ‘रेरा’ कायद्यांतर्गत जप्त केलेल्या कल्याणमधील आंबिवली येथील बांधकाम प्रकल्पातील मालमत्तेचा सोमवारी लिलाव करण्यात येणार आहे. कल्याण तहसीलदार अमित सानप यांनी याबाबत पत्रक प्रसिद्ध केले आहे.
आंबिवली-मोहिली येथे कांबर कन्स्ट्रक्शनच्या प्रकल्पात तक्रारदार प्रज्ञा साबळे यांनी घर खरेदी केले होते. मात्र, विकासकाने घराचा ताबा वेळेत न दिल्याने त्यांनी ‘रेरा’कडे धाव घेतली. याप्रकरणी रेराने संबंधित मालमत्तेचा लिलाव करून साबळे यांना पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सोमवारी कल्याण तहसीलदार अमित सानप कारवाई करणार आहेत.
साबळे या कळवा येथील रहिवासी आहेत. त्यांनी २०१३ मध्ये मोहिली-आंबिबली येथील कांबर कन्स्ट्रक्शन कंपनीकडून २-बीएचके घर घेतले होते. करारानुसार २०१५ मध्ये ताबा मिळणे अपेक्षित होते. ताबा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला असता त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे साबळे यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये न्यायालय आणि रेराकडे धाव घेतली होती. महारेरा मुंबई निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आदेशानुसार ५१ लाख ८८ हजार ८९० रुपयांची रक्कम व्याज आणि दाव्याच्या खर्चासह वसूल करण्याचे आदेश कल्याण तहसीलदार यांना दिले होते. त्यानुसार, वारंवार नोटिसा बजावूनही वसुली न झाल्याने ५ आॅक्टोबर २०१८ रोजी विकासकाची मोहिली येथील स.नं.३३ /२ ही मालमत्ता जप्त करण्यात आली. महारेरा मुंबई व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवारी या मालमत्तेची विक्री होणार आहे. रेरा कायद्यांतर्गत ठाणे जिल्ह्यात झालेली ही पहिली कारवाई असल्याची चर्चा सुरू आहे.