मध्य प्रदेशातून ठाणे पोलिसांनी मिळवून दिली अपहारातील ऑडी कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:42 AM2021-11-29T00:42:50+5:302021-11-29T00:48:02+5:30
वापरण्यासाठी घेतलेल्या ३० लाखांच्या ऑडी कारचा अपहार करुन ती मध्य प्रदेशात बेकायदेशीरपणे विकणाऱ्या हरिश्चंद्र भोईर याला नौपाडा पोलिसांनी अलिकडेच अटक केली. त्यापाठोपाठ ही मोटारही जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी रविवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वापरण्यासाठी घेतलेल्या ३० लाखांच्या ऑडी कारचा अपहार करुन ती मध्य प्रदेशात बेकायदेशीरपणे विकणाऱ्या हरिश्चंद्र भोईर याला नौपाडा पोलिसांनी अलिकडेच अटक केली. त्यापाठोपाठ ही मोटारही जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी रविवारी दिली.
ठाण्यात राहणाऱ्या अजय तन्ना यांनी एका बँकेतून कर्ज घेऊन ऑडी कार विकत घेतली होती. त्याच्याकडून हरिश्चंद्र भोईर याने ही कार दोन वर्षांपूर्वी वापरण्यासाठी घेतली होती. त्याबदल्यात या मोटारीच्या कर्जाचे हप्ते भोईर याने भरण्याचे ठरले. परंतू, त्याने नंतर हाप्तेही भरले नाही आणि मोटारही तन्ना यांना परत केली नाही. बँकेने तगादा लावल्यावर नवीन कर्ज घेऊ, असे सांगत भोईरने सुरेश मोरे याच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये याच मोटारीला तारण ठेवून घेतले. पण पुन्हा मोटारीसाठी भोईर आणि मोरे या दोघांनीही टोलवाटोलवी केली. अखेर याप्रकरणी २३ ऑक्टोबर रोजी मोटारीच्या अपहाराचा गुन्हा तन्ना यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगम पाटील यांच्या पथकाने आधी २३ ऑक्टोबर रोजी आरोपी हरिश्चंद्र भोईर याला अटक केली. त्यानंतर अपहार झालेली आणि बेकायदेशीरपणे मध्य प्रदेशात विकलेली ही ऑडी आणली. ती सुरेश मोरे याच्याकडे असल्याचा सुगावा लागल्यानंतर एका कार डीलरच्या मार्फतीने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील सुभाषनगरातून ही कार आणण्यात नौपाडा पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे भोपाळमध्ये न जाता, पोलिसांच्या वेळेची आणि पैशाची बचत करुन उपनिरीक्षक संगम पाटील, पोलीस नाईक सचिन खरटमोल आणि अंमलदार किशोर काळे यांनी तांत्रिक विश्लेषण आणि जनसंपर्काच्या माध्यमातून अपहारातील ही मोटार २५ नोव्हेंबर रोजी जप्त केली.