कोपर रेल्वे उड्डाणपुलाला आता १५ ऑगस्टचा मुहूर्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:43+5:302021-07-15T04:27:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शहराच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. मात्र, राजाजी ...

August 15 at Kopar railway flyover? | कोपर रेल्वे उड्डाणपुलाला आता १५ ऑगस्टचा मुहूर्त?

कोपर रेल्वे उड्डाणपुलाला आता १५ ऑगस्टचा मुहूर्त?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : शहराच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. मात्र, राजाजी पथवरील अंडरपास पुलाचे काम संथपणे सुरू आहे. अजूनही या पुलाचा स्लॅब भरला गेलेला नाही. या कामाला विलंब होत असल्याने कोपर पुलाचे काम जुलैअखेर पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे आता १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर पूल खुला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

शहरातील ४५ वर्षे जुना कोपर रेल्वे उड्डाणपूल धोकादायक झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने तो १५ सप्टेंबर २०१९ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने केले जाणार होते. मात्र, एकीकडे या पुलाचा आराखडा उपलब्ध नव्हता, तर दुसरीकडे लॉकडाऊन व पुनर्बांधणीच्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुलाच्या कामाला सुरुवातीलाच विलंब झाला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अनलॉक सुरू होताच या पुलाच्या कामाला गती दिली. मार्च २०२१ अखेरपर्यंत या पुलाचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न होता.

कोपर रेल्वे उड्डाणपुलाच्या शेजारी पूर्वेला राजाजी पथवरील जुना अंडरपासवरील पूलही कमकुवत झाला होता. त्यामुळे तेथे नवीन पूल उभारण्याचे कामही एकाचवेळी सुरू करण्यात आले. या पुलाच्या गर्डरच्या फेब्रिकेशनचे काम औरंगाबाद येथे करून ते मार्च अखेरीस डोंबिवलीत आणण्यात आले. त्यानंतर दोन टप्प्यांत २१ मीटरचे गर्डर बसवण्यात आले. मेच्या पहिल्या आठवड्यात गर्डर बसवून त्यानंतर स्लॅब टाकणे व इतर कामे लवकर पूर्ण करून जूनअखेर वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट्य ठरविण्यात आले होते.

पावसाने उघडीप देताच काम

पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम व राजाजी पथ ते टंडन रोडच्या रुंदीकरणही झाले आहे. केवळ स्लॅब टाकणे, त्यानंतर डांबराचा सील कोट मारणे ही कामे बाकी होती. मात्र, स्लॅबसाठी लोखंडी सळ्या बांधण्यातच खूप विलंब लागला आहे. आता पावासने पूर्ण उघडीप दिल्यानंतरच स्लॅब भरता येणार आहे. त्यानंतर क्युरिंगसाठी २८ दिवस लागणार आहे. त्यानंतरच डांबराचा सील कोट मारण्यात येणार आहे. या सगळ्या अडचणी पाहता जुलै अखेरपर्यंत कोणत्याही स्थितीत पुलाचे काम पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे १५ ऑगस्टच्या मुहूर्तावरच पूल खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

------------

Web Title: August 15 at Kopar railway flyover?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.