कर्जबाजारीपणाला कंटाळून औरंगाबादच्या व्यावसायिकाची ठाण्यात आत्महत्या; खाडीत सापडला मृतदेह
By जितेंद्र कालेकर | Published: October 23, 2022 08:30 PM2022-10-23T20:30:31+5:302022-10-23T20:30:46+5:30
कळवा खाडीत नवीन ब्रिजजवळ, जय भीमनगर कळवा पश्चिम येथे खाडीतील पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती कळवा पोलिसांना २२ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता मिळाली.
ठाणे : वाहन खरेदी - विक्रीच्या व्यवसायात आलेले अपयश तसेच कर्जाऊ आणि उधारीवर घेतलेली २० ते २५ लाखांची रक्कम परत करता येत नसल्याच्या तणावातून औरंगाबादच्या सचिन पद्माकर आहेर (४६) या व्यावसायिकाने ठाण्यातील खाडीत आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
कळवा खाडीत नवीन ब्रिजजवळ, जय भीमनगर कळवा पश्चिम येथे खाडीतील पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती कळवा पोलिसांना २२ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता मिळाली. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकासह अग्निशमन दलाने हा मृतदेह खाडीतून पोलिसांच्या उपस्थितीत पाण्यातून बाहेर काढला. सहायक पोलीस निरीक्षक योगेश शिरसाठ आणि उपनिरीक्षक पोतेकर यांच्या पथकाने या मृतदेहाची घटनास्थळी पाहणी केली. तेव्हा त्याच्या गालावर खरचटलेल्या व्यतिरिक्त कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. हा मृतदेह पाण्यात भिजल्यामुळे त्याच्या शरीराचा बराच भाग सडलेला होता. त्याच्या पॅन्टच्या खिशात मिळालेल्या आधार आणि पॅन कार्डच्या आधारे त्याचे नाव सचिन पद्माकर आहेर (रा. लक्ष्मीनगर, वैजापूर, औरंगाबाद) असे असल्याची माहिती समोर आली. त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे. त्याच्या मागे पत्नी, वडील, १७ आणि १३ वर्षांची दोन मुले असा परिवार आहे.
सहा महिन्यांपासून वाशीत वास्तव्य -
औरंगाबादच्या वैजापूर येथे वास्तव्यास असलेला सचिन सहा महिन्यांपासून नवी मुंबईतील वाशीत राहात होता. जुन्या मोटार कार खरेदी - विक्रीचा त्याचा व्यवसाय होता. औरंगाबादमध्ये त्याला या व्यवसायात तोटा आला होता. यातून तो कर्जबाजारी झाला. तो सहा महिन्यांपासून वाशीत मित्रांसोबत वास्तव्य करीत होता. त्याच्यावर २० ते २५ लाखांचे कर्ज होते. त्यामुळेच त्याला उधार आणि कर्जाऊ पैसे देणाऱ्यांनी त्याच्याकडे तगादा लावला होता, अशी माहिती त्याची पत्नी आणि वडिलांनी पोलिसांना दिली. वैफल्यग्रस्त असल्यामुळे त्याने वाशीतील खाडीत स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.