रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, प्रवाशी महिलेची दागिने व रोख रक्कम भरलेली पिशवी दिली परत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 12:24 PM2018-01-10T12:24:54+5:302018-01-10T12:25:54+5:30
एका रिक्षा चालकाने रिक्षात सोन्याचे दागिने व रोख असा सुमारे 3 लाखांचा ऐवज विसरून गेलेल्या महिला प्रवाशाची पिशवी मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात जाऊन परत केली
मीरा रोड - एका रिक्षा चालकाने रिक्षात सोन्याचे दागिने व रोख असा सुमारे 3 लाखांचा ऐवज विसरून गेलेल्या महिला प्रवाशाची पिशवी मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात जाऊन परत केली. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे पोलिसांसह नागरिकांनी कौतुक केले. नागेश मोहतो हा रिक्षाचालक दहिसरच्या रावळपाडा येथून परवीन मुल्ला या महिला प्रवाशाला मीरा रोडच्या नयानगर मध्ये सोडले. मोबाइलवर बोलण्याच्या नादात त्या स्वतःकडील सोन्याचे दागिने व रोख असा सुमारे तीन लाखांचा ऐवज असलेली बॅग रिक्षातच विसरून गेल्या.
रिक्षा चालक देखील रिक्षाचे भाडे घेऊन निघून गेला. तोच परवीन यांच्या लक्षात आले की, त्या दागिने व रोख असलेली बॅग रिक्षातच विसरून गेल्या आहेत. त्यांना धक्काच बसला. आपल्या वडिलांसोबत त्यांनी नया नगर पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांनी देखील घटनेचे गांभीर्य पाहून त्वरित पोलिसांना रिक्षाच्या शोधार्थ रवाना केले. पण काही वेळातच मोहतो हा परवीन यांची बॅग घेऊन नया नगर पोलीस ठाण्यात आला.
दागिने व रोख रक्कम असलेली बॅग परत मिळाल्याचे पाहून परवीन यांना तर आनंदाचा धक्काच बसला. त्यांनी रिक्षा चालकाचे अनेकदा आभार मानले. पोलिसांनी देखील रिक्षा चालक नागेश मोहतो याच्या प्रामाणिकपणा बद्दल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन कौतुक केलं.
'परवीन यांना सोडल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास जेवणाचा विचार केला असता मागे बॅग दिसली. ती उघडून पहिली असता आतमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम होती. परवीन यांना जिकडे सोडले होते तिकडे गेलो व त्यांचा शोध घेतला. पण त्या न सापडल्याने नया नगर पोलीस ठाण्यात बॅग देण्यासाठी आलो', असे नागेश यांनी सांगितले..