लेखक हे विशेषणच बरखास्त करण्याची आवश्यकता

By admin | Published: May 4, 2017 05:39 AM2017-05-04T05:39:32+5:302017-05-04T05:39:32+5:30

प्रत्येक व्यक्ती लिखाण करू शकते. त्यांच्याही मनात काही ना काही सुरू असते. परंतु, ते लिहीत नाही. प्रत्येकाने लिखाण

The author needs to dismiss this specialty | लेखक हे विशेषणच बरखास्त करण्याची आवश्यकता

लेखक हे विशेषणच बरखास्त करण्याची आवश्यकता

Next

डोंबिवली : प्रत्येक व्यक्ती लिखाण करू शकते. त्यांच्याही मनात काही ना काही सुरू असते. परंतु, ते लिहीत नाही. प्रत्येकाने लिखाण करावे आणि सहा महिने त्या कागदाकडे पाहू नये. लिखाण तपासून पाहिल्यास त्यात स्वत:लाच खूप चुका सापडतील. इतक्या चुका वाचकांनाही कधी मिळणार नाहीत. कोणत्याही वेळी लिखाण करा. लेखक हे विशेषणच बरखास्त केले पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. रविन थत्ते यांनी व्यक्त केले.
‘सवाई कट्ट्या’तर्फे ‘संवाद लेखक डॉक्टरांशी’ हा कार्यक्रम नुकताच स.वा. जोशी विद्यालयात झाला. या वेळी डॉ. थत्ते बोलत होते. या परिसंवादात मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू बालशल्यविशारद डॉ. स्नेहलता देशमुख, दोंडाईचे शल्यविशारद डॉ. रवींद्र टोणगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
वैद्यकीय व्यवसायात असूनही लेखन केलेल्या डॉक्टरांच्या लिखाणामागच्या प्रेरणा, दोन्ही वेगळ्या विषयांतील एकत्रित मुशाफिरी, रुग्णांबरोबरच वाचकांशी संवाद साधण्याची कला, अशा विविध पैलूंना स्पर्श या मुलाखतीत करण्यात आला. आरोग्यविषयक पुस्तकांचे प्रदर्शनही येथे भरवण्यात आले होते.
थत्ते म्हणाले की, प्रत्येक मनुष्य लेखक असतो. कुणी कागदावर, तर कुणी मनावर लिहितात. ज्ञानेश्वरांच्या ओव्या घेऊन लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर, त्यांचा अर्थही लिहिला. तरुण पिढी मराठी फारसे वाचत नाही, हे लक्षात आल्यावर साडेसहा वर्षांनंतर त्यांचे इंग्रजीत भाषांतर केले. आपण एक पान मजकूर लिहीत असलो, तरी त्यासाठी मनात आधीच विचार सुरू असतात. प्रत्येक क्षणांचा वापर मी वाचनासाठी करीत असतो. माझ्या ‘मी हिंदू बोलतोय’ या पुस्तकाव्यतिरिक्त कोणत्याच पुस्तकावर टीका झाली नाही. बहुधा, ती कोणी वाचलीच नसावीत. ‘मी हिंदू बोलतोय’ या पुस्तकावर टीका झाल्याने अल्पावधीत त्याच्या ४०० प्रती विकल्या गेल्या. पण, या टीकेमुळे माझा माझ्यावरचा विश्वास उडाला. आता मात्र सावधपणे लिहितो. मला लिखाणासाठी जे सुचते, त्याचा आणि वाचनाचा फारसा काही संबंध नसतो. प्रल्हाद अत्रे यांचे नाव कधीच घेतले जात नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांचे नाव घेतले पाहिजे होते. परंतु, त्यांचा विसर पडला आहे. माझ्या मराठी माणसाने जे सांगितले, ते सर्वत्र पोहोचवण्यासाठी इंग्रजीत लिहितो. स्वत:लाच पत्र लिहायला शिका. माझे पुस्तक कोणी वाचते का, असे कुणालाही विचारू नका, असा सल्लाही दिला.
टोणगावकर म्हणाले, डोक्यात जे विचार सुरू असतात, ते कागदावर उतरवत असतो. लिखाणात नावीन्य पाहिजे. पुस्तके सोप्या भाषेत असतील, तर वाचक मोठ्या प्रमाणावर ती वाचतील, असे सांगितले.
डॉ. देशमुख म्हणाल्या की, माझ्या लिखाणाची प्रेरणा माझी आईच होती. माझी सकाळ आईच्या गाण्यांनी होत असे. तिच्या भावनाप्रधान गाण्यांनी आपणही कागदावर काही का लिहू नये, असे वाटू लागले. त्यातूनच, लिखाणाची सुरुवात झाली. बालरोगतज्ज्ञ असल्याने प्रथम ‘बाळाची काळजी’ हे पुस्तक लिहिले. लिखाणासाठी मला वेळ किंवा विशिष्ट जागा लागत नाही’, असे त्या म्हणाल्या. आपण पायी करतो, तो खरा प्रवास. पण, हृदय व मन ओतून करतो, ती यात्रा. मन व हृदय ओतून करतो, त्या लिखाणावर टीका होत नाही. ‘गर्भसंस्कार’ या शब्दावर टीका झाली. आपण त्याला माहिती देणे असेही बोलू शकतो. त्यावेळी गर्भसंस्कार हा शब्दप्रयोग योग्य वाटल्याचे त्या पुढे म्हणाल्या. (प्रतिनिधी)

माणुसकी महत्त्वाची

तुम्ही मंदिरात किती वेळा जाता, याला महत्त्व नाही. माणुसकी किती दाखवता, हे महत्त्वाचे आहे. मग, आस्तिक व नास्तिक याला अर्थ उरत नाही.
आजकाल प्रत्येक मालिकेमधून संस्कृत भाषेचा उल्लेख होत आहे. मग, तो ओवी किंवा श्लोकाच्या स्वरूपात का होईना, पण संदर्भ येत आहे. त्यामुळे संस्कृत भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. संस्कृत भाषेकडे मुलेही मोठ्या प्रमाणावर वळू लागली आहेत. व्हॉट्सअ‍ॅप असले, तरी स्वत:च्या हस्ताक्षरात पत्रव्यवहार होणे गरजेचे आहे.

Web Title: The author needs to dismiss this specialty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.