काळू धरण क्षेत्रातील गावांत अधिकाऱ्यांना केली प्रवेशबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 11:45 PM2021-01-15T23:45:02+5:302021-01-15T23:45:18+5:30
ग्रामस्थ आक्रमक : फलक लावून दर्शविला तीव्र विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : ठाणे शहराची तहान भागविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या काळू धरणाच्या उभारणीसाठी पुन्हा हालचाली सुरू होताच धरणक्षेत्रातील ग्रामस्थांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. येथील गावांमध्ये आता धरणासंबंधी काम करण्याकरिता येणाऱ्या कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तशा आशयाचे फलक या गावांच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी काळू धरणाच्या कामासंदर्भात गावात येऊ नये, असा थेट धमकीवजा इशाराच ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे काळू धरणविरोधी संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.
शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाच त्यांना पुरेसे पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरत आहेत. ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीप्रश्नावरून गोंधळ झाला. तर पाण्याची गरज भागविण्यासाठी ठाणे महापालिकेने स्टेम प्राधिकरण, भातसा धरण आणि एमआयडीसीकडे अतिरिक्त पाण्याची मागणी केली आहे. तसेच स्वतःच्या मालकीचे धरण व्हावे यासाठी मुरबाड तालुक्यातील ११ वर्षांपासून रखडलेल्या काळू धरणाच्या उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र काळू धरण क्षेत्रात येणाऱ्या ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी हे धरण रद्द करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात येथील शेतकऱ्यांनी संयुक्त बैठका घेत या धरणाला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतला.
गावांच्या प्रवेशद्वारांवर फलक
nबांगरवाडी, चासोळे, आंबिवली, तळेगाव, जडई, फांगळोशी, दिघेफळ, खुटल या गावांमध्ये प्रवेशद्वारांवर प्रवेशबंदीचे फलक लावले आहेत. शेती हेच आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असून आता विस्थापित झाल्यास आमच्या शेतीचे काय, त्यामुळे आम्ही गाव सोडणार नाही, असे चासोळे गावच्या हरी राऊत यांनी केला आहे.
nतर शहरांची तहान भागविण्यासाठी आणखी किती काळ शेतकऱ्यांना विस्थापित करणार आहात? मुंबईला पाणीपुरवठा करण्याचा ठेका घेतला आहे का, असा सवाल किसन आलम यांनी उपस्थित केला आहे. तर आम्हाला आताच सुगीचे दिवस आले असून तेही हिरावून घेऊ नका, असा सूर येथील तरुणांमध्ये उमटत आहे.