कल्याण आरटीओविरोधात रिक्षा चालक युनियन करणार आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 03:53 PM2019-07-13T15:53:59+5:302019-07-13T15:59:24+5:30
वाहनांची तपासणी, पासिंगसाठी आधी जून्या ठिकाणची आधारवाडी जवळची जागा आरटीओ विभागाला अपुरी पडत होती.
डोंबिवली - वाहनांची तपासणी, पासिंगसाठी आधी जून्या ठिकाणची आधारवाडी जवळची जागा आरटीओ विभागाला अपुरी पडत होती. त्यानंतर आता नांदिवली येथील नव्या जागेत ती सुविधा देण्यासाठी आरटीओने सुरुवात केली असली तर तेथेही उद्भवणाऱ्या असुविधांमुळे वाहनचालक जेरीस आले आहेत. पासिंगसाठी तासनतास थांबावे लागत आहे. त्यातच जर पहिल्या दिवशी पासिंग झाले नाही तर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीही यावे लागत आहे. या त्रासाविरोधात न्याय मिळवण्यासाठी डोंबिवलीतील रिक्षा चालक मालक युनियन पुढील आठवड्यात आरटीओच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी म्हणाले की, सातत्याने वाहनचालकांना त्या ठिकाणी वेठीस धरले जात आहे. अनेकदा यासंदर्भात आरटीओ अधिकाऱ्यांना सांगूनही सुधारणा होत नाही. त्यामुळे वाहनचालकांना ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांचा दिवसाचा खाडा होतो. त्या ठिकाणी जायचे आणि खूप वेळ वाट बघायची, ताटकळत बसायचे. यात त्यांचा वेळ जातो, रोजीचा खाडा होतो. त्यामुळे यंत्रणा सक्षम करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा आहे. पावसाच्या दिवसात वाहनात तरी किती वेळ बसणार, तसेच त्या ठिकाणी अन्यत्र आसरा घेण्याची सुविधा नाही. त्यामुळे वाहने आली की काम झटपट व्हावीत, वाहनचालकांना वेगवान यंत्र प्रणालीने दिलासा मिळावा अशा मागण्यांसाठी पुढील आठवड्यात गुरूपौर्णिमेनंतर आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात आरटीओ अधिकाऱ्यांना २५ जून रोजी पत्र दिले असून अद्यापही कोणतीही विशेष सुुधारणा झालेली नाही. त्यामुळे आमच्या पत्राला केराची टोपली दाखवली का? रिक्षाचालकांसह सामान्य चालकांच्या समस्यांना कोणी वाली आहे की नाही? यासाठी सामान्यांनीही आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जोशी यांनी केले.