स्वायत्त महाविद्यालयांनी नवे बदल स्वीकारण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:51+5:302021-07-04T04:26:51+5:30
ठाणे : स्वायत्त महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या परिप्रेक्ष्यात नवे बदल स्वीकारण्याची नितांत गरज असल्याचे मत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे ...
ठाणे : स्वायत्त महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या परिप्रेक्ष्यात नवे बदल स्वीकारण्याची नितांत गरज असल्याचे मत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे प्रमुख सल्लागार व माजी प्राचार्य डॉ. विजय जोशी यांनी व्यक्त केले. स्वायत्त महाविद्यालयांनी सृजनात्मक कार्यपद्धती अवलंबून नवीन शैक्षणिक धोरण अमलात आणण्यासाठी आदर्श कार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला, वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय व रामानंद आर्य स्वायत्त महाविद्यालय, भांडूप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वायत्त महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणे राबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत (एफडीपी) बीजभाषण करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मेकॉलेच्या इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे केवळ कारकून निर्माण करणारी शिक्षणव्यवस्था आपण आतापर्यंत राबवली, ज्यामध्ये संपूर्णपणे भारतीयत्वाचा अभाव होता. परकीय आक्रमकांनी येथील शिक्षण पद्धती मुळासकट नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा एकदा भारतीय मूल्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी व शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण अस्तित्वात आले. ६६ पानांच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यामध्ये २०० पेक्षा जास्त वेळेला शिक्षक हा शब्द आला असून, शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रगतिशील शिक्षक व नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवल्या गेलेल्या रणजित डिसले गुरुजी यांचे उदाहरण देऊन त्यांनी शिक्षकांनी नवनवे प्रयोग केले पाहिजेत, असे नमूद केले.
भारतात अवघी ९०० महाविद्यालये स्वायत्त
‘विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी मूलगामी बदल नवीन शैक्षणिक धोरण सुचवते. निर्धारित अभ्यासक्रमांची पुनर्मांडणी करून विद्यार्थी त्यातून नक्की काय शिकला, हे अधोरेखित करणारे नवे धोरण असले पाहिजे. भारतात असलेल्या ४० हजारपेक्षा अधिक चांगल्या महाविद्यालयांतून केवळ ९०० महाविद्यालयांना स्वायत्तता दर्जा मिळाला आहे. त्या मानाने ही संख्या फारच थोडी आहे. आपल्या परिसरात असलेले उद्योगधंदे व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आपण निर्माण करावयास हवे, असेही ते म्हणाले.
-------------
फोटो मेलवर