कल्याणच्या बी.के.बिर्ला महाविद्यालयाला ‘स्वायत्त दर्जा’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 03:36 PM2018-07-26T15:36:48+5:302018-07-26T15:38:45+5:30
स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याने आता कौशल्याधारीत आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याची मुभा प्राप्त झाली आहे.
कल्याण - आपल्या दर्जेदार शिक्षण आणि चमकदार कामगिरीमूळे नेहमीच अग्रेसर असलेल्या कल्याणच्या बी.के.बिर्ला महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा असा ‘स्वायत्त दर्जा’ मिळवला आहे. त्यामूळे मुंबई विद्यापीठाच्या स्वायत्त महाविद्यालयांच्या यादीमध्ये आता बिर्ला महाविद्यालयाचाही समावेश झाला आहे. बिर्ला महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओ. आर.चितलांगे यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत ही माहीती दिली.
मुंबई विद्यापीठांतर्गत आतापर्यंत असणाऱ्या केवळ 12 महाविद्यालयांनाच हा दर्जा देण्यात आला आहे. स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याने आता कौशल्याधारीत आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याची मुभा प्राप्त झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच फोटोग्राफी आणि अॅनिमेशन हे दोन कोर्स सुरू केले जाणार आहेत. तसेच परीक्षांसाठीचे पेपर बनवण्याचे आणि निकाल जाहीर करण्याचे अधिकारही बिर्ला महाविद्यालयाला प्राप्त झाले आहेत. तर इथेच आम्ही थांबणार नसून विद्यापीठाच्या दर्जासाठी आमचा पुढचा प्रवास आणि प्रयत्न सुरू झाल्याचेही चितलांगे यांनी सांगितले.
स्वायत्त दर्जानंतर महाविद्यालयाच्या फी मध्ये आणि प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचे अधिकार मात्र महाविद्यालयाला नाहीत. शासनाच्या नियमानुसारच ते निश्चित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला सुबोध दवे, डॉ. अशोक प्रधान, डॉ. नरेश चंद्र, गीता उन्नीकृष्णन, डॉ. स्वप्ना समेळ, अविनाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.