हिरेन कथित हत्याप्रकरणी ठाणे एटीएसकडून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 05:21 AM2021-03-18T05:21:51+5:302021-03-18T07:28:13+5:30

मुंबईतील ॲंटालिया इमारतीजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून वेगवेगळी माहिती मिळत असताना याच प्रकरणात बुधवारी सायंकाळी राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली.

autopsy Doctors inquiry by Thane ATS alleged murder case | हिरेन कथित हत्याप्रकरणी ठाणे एटीएसकडून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

हिरेन कथित हत्याप्रकरणी ठाणे एटीएसकडून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

Next

जितेंद्र कालेकर - 


ठाणे : मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणाची चौकशी दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) आता वेगाने करण्यात येत आहे. एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवदीप लांडे यांच्या पथकाने बुधवारी मनसुख यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख 
डॉ. मंगेश घाडगे यांच्यासह तीन डॉक्टरांची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (autopsy Doctors inquiry by  Thane ATS alleged murder case)

मुंबईतील ॲंटालिया इमारतीजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून वेगवेगळी माहिती मिळत असताना याच प्रकरणात बुधवारी सायंकाळी राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली. त्याचवेळी गेल्या १० ते १२ दिवसांपासून काहीशा संथ गतीने सुरू असलेल्या एटीएसच्या तपासालाही आता गती यायला सुरुवात झाली आहे. बुधवारी लांडे यांनी एटीएसच्या ठाणे कार्यालयास भेट दिली. त्या वेळी उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त श्रीपाद काळे यांच्या पथकाला या प्रकरणी कसून चौकशीचे आदेश दिले. या हत्या प्रकरणात येणारे सर्व प्रकारचे बारकावे पुन्हा एकदा तपासून पाहण्याचे आदेश त्यांनी दिले. मनसुख यांनी मृत्यूपूर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रातील तपशील तसेच शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाचा प्राथमिक अहवाल अशा अनेक बाबींचा नव्याने अभ्यास केला. 

दरम्यान, मनसुख यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे ठाणे महापालिकेच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश घाडगे, डॉ. राजेश्वर पाटे आणि डॉ. वैभव बारी यांनाही बुधवारी तब्बल १३ दिवसांनंतर एटीएसच्या ठाणे कार्यालयात पाचारण केले होते. डॉ. घाडगे यांच्या समितीने यापूर्वीच व्हिसेरा प्रिजर्व अ‍ॅण्ड ओपिनियन रिजर्व, असे मत देऊन मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले नव्हते. परंतु, सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मनसुख यांच्या फुप्फुसामध्ये काही प्रमाणात खाडीचे पाणी मिळाले होते. एखाद्या हत्या प्रकरणात एखाद्या व्यक्तीला आधीच मारले तर फुप्फुसामध्ये पाणी मिळत नाही, असे बोलले जाते. मग, हिरेन प्रकरणात नेमक्या कोणत्या शक्यता असू शकतात? पाण्यात डुंबविण्यात आले की ते बुडाल्यानंतर हे पाणी शरीरात गेले? तसेच तोंडात रुमाल नेमके कशामुळे होते? हे रुमाल काढतेवेळी पंचनामा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याचीही चौकशी करण्यात आली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मुंबईच्या सीआययू युनिटचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे एका सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाºयासह तिथे आले होते. वाझे तिथे नेमकी कोणत्या कारणासाठी आले होते? अशा अनेक प्रश्नांचे खल एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेत ठाण्यातील बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हरियाणाच्या लॅबचेही मत घेणार एटीएस
मनसुख हिरेन यांच्या मृतदेहातील फुफ्फुसामधील पाण्याबाबत शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांच्या पथकात एकमत नाही. त्यामुळे ‘इट इज ओन्ली स्क्रिनिंग’ असे या अहवालात म्हटले आहे. पाणी आहे की नाही हे नेमकी स्पष्ट होत नाही. अन्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून मत घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबई एटीएसचे पथक आता हरियाणा येथील न्यायवैद्यक विभागातून याबाबतचे मत मागविणार किंवा तिकडील प्रयोगशाळेत मनसुख यांच्या फुफ्फुसाचा भाग पाठविणार असल्याची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने ‘लोकमत’ला दिली.
 

Web Title: autopsy Doctors inquiry by Thane ATS alleged murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.