वर्दीवर हात टाकणारा रिक्षाचालक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:45 AM2021-08-25T04:45:21+5:302021-08-25T04:45:21+5:30
मीरा रोड : वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याचा गणवेश (वर्दी) फाडून शिवीगाळ, धक्काबुक्की करणाऱ्या रिक्षाचालकास ताब्यात घेत, गुन्हा दाखल करण्यात ...
मीरा रोड : वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याचा गणवेश (वर्दी) फाडून शिवीगाळ, धक्काबुक्की करणाऱ्या रिक्षाचालकास ताब्यात घेत, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोककडे जाणाऱ्या फेस १ च्या मार्गावर रिक्षाचालक विजय झा व कारचालक राजेंद्र कुमावत यांच्यात रविवारी अपघात झाला. त्यावरून वाद झाला. कुमावत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक (गोल्डन नेस्ट) वाहतूक चौकी येथे जाऊन तेथील पोलिसांकडे मदत मागितली. रिक्षाने कारला ठाेकले आहे. मात्र, रिक्षाचालकच शिवीगाळ करत असल्याचे सांगितले. त्यानंतर, वाहतूक पोलीस सिद्धार्थ भालेराव, सहायक फौजदार दत्तात्रय महाडिक व मनीष शिंदे हे रिक्षाचालकाला समजावण्यासाठी गेले. पोलिसांनी दोघांना रस्त्यावर भांडू नका. पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करा, असे सांगितले. झा याने भालेराव यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. धक्काबुक्की करून, त्यांच्या शर्टाचे बटन तोडून शर्ट फाडला, तसेच महाडिक यांनाही शिवीगाळ करत अंगावर धावून गेला. अखेर पोलीस व लोकांनी मिळून रिक्षाचालकास पकडून नवघर पोलीस ठाण्यात नेले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.