नालेसफाईची कामे सरासरी ६० टक्के, ३१ मे पर्यंत काम पूर्ण करणार; आयुक्तांचा दावा

By अजित मांडके | Published: May 24, 2024 04:26 PM2024-05-24T16:26:42+5:302024-05-24T16:27:55+5:30

ठाणे महापालिका हद्दीतील नालेसफाई बाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच त्याची दखल घेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष नालेसफाईकांच्या कामांची पाहणी केली.

average 60 percent of drain cleaning works will be completed by may 31 kdmc commissioner claims | नालेसफाईची कामे सरासरी ६० टक्के, ३१ मे पर्यंत काम पूर्ण करणार; आयुक्तांचा दावा

नालेसफाईची कामे सरासरी ६० टक्के, ३१ मे पर्यंत काम पूर्ण करणार; आयुक्तांचा दावा

अजित मांडके, ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील नालेसफाई बाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच त्याची दखल घेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष नालेसफाईकांच्या कामांची पाहणी केली. तसेच ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईचे काम काहीसे उशीरा सुरू झाले असले तरी आता ते सरासरी ६० टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच हे काम वेगाने सुरू असून ३१ मेपर्यंत सगळे काम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

यंदा देखील नालेसफाई उशीराने सुरु झाल्याने त्यामुळे यंदाही ठाणे तुंबणार अशा आशयाचे वृत्त शुक्रवारी लोकमतमध्ये प्रसिध्द झाले. त्यानंतर आयुक्तांनी लागलीच शहरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. दरम्यान, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे काम उशिराने सुरु झाल्याने हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला ५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

दुसरीकडे आयुक्तांनी प्रथम, कळवा येथील महात्मा फुले नगर येथील नाल्यातील गाळ काढण्याचा कामाचा आढावा घेतला. रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यांवर जाळ्या बसवाव्यात. त्यात साठणारा कचरा नियमितपणे उचलला जावा. म्हणजे नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोट्यवधींचा खर्च कमी होईल. त्यादृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. तसेच, स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक यांची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर, उथळसर प्रभाग समितीतील ऋतू पार्क येथील नालेसफाईचे काम आयुक्तांनी पाहिले. वर्तकनगर प्रभाग समितीतील कापूरबावडी नाला, थिराणी नाला, वागळे इस्टेट मधील आनंद इंडस्ट्रीज येथील नाला, नौपाडा प्रभाग समितीतील सुपरमॅक्स कंपनी लगतचा नाला, परब वाडी येथील नाला येथे त्यांनी पाहणी केली. यावेळी, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. पावसाळा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन नालेसफाईचे काम आणखी जलद करावे. तसेच, नाले, गटारे यातून काढलेला गाळ तातडीने उचलावा, याचा आयुक्त राव यांनी पुनरुच्चार केला.

Web Title: average 60 percent of drain cleaning works will be completed by may 31 kdmc commissioner claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.