कपातीतही बिल सरासरीएवढेच
By Admin | Published: March 4, 2016 01:37 AM2016-03-04T01:37:26+5:302016-03-04T01:37:26+5:30
लघुपाटबंधारे विभागाने आॅक्टोबर २०१५ पासून लागू केलेल्या कपातीनुसार शहराला आठवड्यातून ४ ते ५ दिवसच पाणीपुरवठा होतो
भार्इंदर : लघुपाटबंधारे विभागाने आॅक्टोबर २०१५ पासून लागू केलेल्या कपातीनुसार शहराला आठवड्यातून ४ ते ५ दिवसच पाणीपुरवठा होतो. कमी पाणी मिळत असतानाही प्रशासनाकडून पाणीबिल नेहमीप्रमाणे सरासरीएवढेच दिल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बिलातून कपातीचा कालावधी वगळून वसुली करावी, अशी मागणी केली जात आहे.
पालिकेकडून दर चार महिन्यांनी बिले काढली जातात. ही बिले मीटर रीडिंगप्रमाणे वसूल केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी सुमारे २५ टक्कयांहून अधिक गृहसंकुलांना पाण्याचे मीटर बसविलेले नाहीत. त्यामुळे ज्या गृहसंकुलांना मीटर बसवले आहेत आणि ज्यांना मीटरजोडणी नाही, अशा सर्व ग्राहकांकडून पालिका सरासरी पाण्याचे बिल वसूल करते. मीटर असणारे ग्राहक जेवढे पाणी तेवढेच बिल भरणार असल्याचा दावा करीत आहे. त्याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करून सर्वांनाच सरासरी बिले पाठवत आहे. त्यातच, शहराला आॅक्टोबर २०१५ पासून ३० टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर काही ठिकाणी दर आठवड्याला ४ ते ५ दिवस तर काही ठिकाणी ३ ते ४ दिवसच पाणीपुरवठा होत आहे. शिवाय, पालिकेने पाणीपुरवठ्यासाठी काही विभागांचे झोन तयार केल्याने शेवटच्या झोनमध्ये असलेल्या नागरिकांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ३० टक्कयांपेक्षाही अधिक पाणीकपात असताना नागरिक वाढीव पाणीबिल पालिकेला भरत आहेत. पाणीकपातीचा कालावधी बिलातून वगळण्याची मागणी सध्या करू लागले आहेत.
अलीकडेच प्रशासनाने सर्व गृहसंकुलांना सरासरी बिले पाठवली असून त्यात नेहमीप्रमाणेच रक्कम दाखवल्यामुळे ती भरण्यास अनेकांनी नकार दिला आहे. ही बिले कमी करूनच निश्चित वसुली केली जावी, अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक ओमप्रकाश गडोदिया यांनी आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडे केली आहे. यावर गडोदिया यांनी सर्वांना पाण्याचे मीटर बसवून त्यातील रीडिंगनुसारच बिलाची वसुली करावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)