आव्हाड गट आणि नाईक गट पुन्हा आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 06:40 AM2018-05-05T06:40:24+5:302018-05-05T06:40:24+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील राष्टÑवादीत पुन्हा दुफळी माजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी आता पुन्हा गणेश नाईक गट सक्रिय झाला असून शहराध्यक्ष हटाव मोहिमेपासून ते कळव्यातून त्यांना हद्दपार करण्यासाठी व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

 Avhad Group and Naik Group News | आव्हाड गट आणि नाईक गट पुन्हा आमने-सामने

आव्हाड गट आणि नाईक गट पुन्हा आमने-सामने

Next

ठाणे - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील राष्टÑवादीत पुन्हा दुफळी माजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी आता पुन्हा गणेश नाईक गट सक्रिय झाला असून शहराध्यक्ष हटाव मोहिमेपासून ते कळव्यातून त्यांना हद्दपार करण्यासाठी व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानुसार, येत्या विधानसभा निवडणुकीत कळव्यातून आगरीकार्ड चालवण्याच्या हालचाली नाईक गटाने सुरू केल्या आहेत. तसेच एमआयएमला हाताशी घेऊन आव्हाडांना त्यांच्याच मतदारसंघात पक्षातील मंडळींनी सुरुंग लावण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
ठाण्यात यापूर्वी राष्टÑवादीमध्ये तीन गट सक्रिय असल्याचे दिसून आले होते. परंतु, आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राष्टÑवादीत दोन गट पडल्याचे दिसून आले आहे. मागील चार वर्षे राजकारणात फारशी सक्रिय नसलेली नाईक फॅमिली पुन्हा एकदा सक्रिय झाली असून त्यांनी आव्हाडांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याच्या हालचाली सुरूकेल्या आहेत. यातूनच त्यांनी पहिला निशाणा थेट शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यावर साधून आधी शहराध्यक्ष बदला, असा नारा देण्यास सुरुवात केली आहे.
परांजपेंचा काटा काढला, तर आव्हाडांना हा मोठा धक्का असू शकतो, अशी चर्चादेखील आता ऐकायला मिळत आहे. त्यामुळे परांजपे हटाव मोहीम मागील काही दिवसांपासून अधिक तीव्र झाली असून पक्षश्रेष्ठींकडे परांजपे यांच्या कामाविरोधात तक्रारी सुरू झाल्या आहेत.
आव्हाडांना पुन्हा त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी केणी कुटुंब सर्वात आघाडीवर असल्याची चर्चा आहे. केणी हे गणेश नाईक गटाचे असल्याचे बोलले जात आहे. ठाणे महापालिका निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपदावरही त्यांचा दावा असताना त्यांना बाजूला सारून आव्हाड समर्थक मिलिंद पाटील यांची त्याठिकाणी वर्णी लावण्यात आली होती. त्यामुळे केणी फॅमिली तेव्हापासून नाराज झाली आहे. त्यामुळे आता बदला घेण्यासाठी नाईक फॅमिलीने केणींकरवी या भागात आगरीकार्ड चालवण्याच्या हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे. यातूनच काही दिवसांपूर्वी कळव्यात अजय-अतुल यांचा कार्यक्रम घेऊन केणी कुटुंबातील मंदार यांना हायलाइट करण्यात आले.
कळवा, विटावा, पारसिकनगर, रेतीबंदर आदी भागांत आगरी समाजबांधव अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे आता केणींकरवी त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरू झाल्याचेही बोलले जात आहे.
येत्या काळात कदाचित मंदार केणी हे आव्हाडांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. परंतु, त्यांचा पक्ष कोणता असेल, हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. असे असले तरी ते शिवसेनेच्या जवळ असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे पक्षातील इतर मंडळींना डावलून शिवसेनादेखील याच आगरीकार्डचा वापर येत्या निवडणुकीत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एमआयएम हाताशी धरून आव्हाडांना घेरणार

आव्हाडांना कळव्यापेक्षाही मुंब्य्रातून अधिक पसंतीची मते मिळाली होती. एमआयएमचा शिरकाव झाल्याने आणि त्यांचा वापर करून शिवसेनेने यापूर्वीदेखील ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत आव्हाडांविरोधात गणिते मांडली.

त्याचे फासे काहीअंशी योग्य पडल्याने आता पुन्हा एमआयएमला हाताशी धरून आव्हाडांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्याचे मनसुबे त्यांच्या पक्षातील काही मंडळींसह शिवसेनेनेदेखील आखले आहेत. परंतु, यात कोणाचे फासे कसे पडतात, हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

Web Title:  Avhad Group and Naik Group News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.