बंदी उठल्यानंतर अविनाश जाधव मुंब्र्यात दाखल, अनधिकृत बांधकामांविषयी उपस्थित केला होता प्रश्न
By अजित मांडके | Published: April 25, 2023 11:13 PM2023-04-25T23:13:28+5:302023-04-25T23:15:26+5:30
राजू गायकवाड हे मुंब्रातील मनसेचे विभाग अध्यक्ष असून राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेतून अनधिकृत बांधकामांविषयी मुद्दा उपस्थित केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज मुंब्र्यातील पदाधिकारी राजू गायकवाड यांच्या घरी भेट दिली. मुंब्रा येथील बंदी नंतर अविनाश जाधव हे पहिल्यांदाच मुंब्रा येथे आले होते कालच त्यांची मुंब्रा येथे येण्यापासून बंदी उठल्यानंतर त्यांनी आज मुंब्रातील पदाधिकारी राजू यांच्या घरी भेट दिली.
राजू गायकवाड हे मुंब्रातील मनसेचे विभाग अध्यक्ष असून राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेतून अनधिकृत बांधकामांविषयी मुद्दा उपस्थित केला होता. त्याच मुद्द्याला घेऊन अविनाश जाधव यांनी देखील मुंब्रा येथील डोंगर वस्तीमध्ये असलेल्या अनधिकृत मस्जिदी व देऊळ यांच्या बद्दल प्रश्न उपस्थित केलेला असताना यानंतरच रमजानचा महिना सुरू झाला. या रमजानच्या महिन्यात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अविनाश जाधव यांना मुंब्रा बंदी सांगण्यात आली होती. 24 एप्रिल रोजी ही बंदी उठवण्यात आली आणि त्यानंतर आज अविनाश जाधव हे स्वतः मुंब्रा येथे दाखल झाले.
अनधिकृत बांधकामांचा विषय ज्वलंत असून मी हा विषय कधीच सोडलेला नाही आणि याबाबत मी सातत्याने माझ्या भूमिकेची आठवण करून देत राहणार आहे असे यावेळी अविनाश जाधव यांनी मुंब्रात सांगितले तर ठाणे शहरातील सौंदर्यता टिकून राहावी हाच माझा उद्देश असून या संदर्भात मी वनअधिकारी यांची भेट घेतलेली आहे व त्यांनी देखील मला 30 तारखेपर्यंत वेळ मागितला आहे 30 तारखेपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन वनविभागाने दिलेले असून जरी कारवाई झाली नाही तर मनसे पाऊल उचलणार असे देखील यावेळी अविनाश जाधव यांनी सांगितले तर माझ्या विरोधकांना काहीही बोलू द्या मी माझी वाघाची चाल खेळणारच अशा शब्दात यावेळी त्यांनी विरोधकांना इशारा देखील दिलेला आहे.