मनसेचे अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी; ठाणे पोलिसांनी बजावली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 07:15 AM2023-03-29T07:15:22+5:302023-03-29T07:15:34+5:30
मुंब्रा परिसरात रमजानच्या महिन्यांमध्ये मनसेच्या या भूमिकेमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी लागू करणारे आदेश पोलिसांनी जारी केले. मुंब्रादेवी डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि मजार पुढील १५ दिवसांत हटवली नाही तर त्याच जागेवर मंदिर बांधू, असा इशारा मनसेने दिला होता. त्यामुळे ठाणे पोलिसांनी जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी लागू करताना त्या परिसरात १४४ कलम लागू केले.
मुंब्रा परिसरात रमजानच्या महिन्यांमध्ये मनसेच्या या भूमिकेमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. गेल्या दोन दिवसांपासून मुंब्रा पोलिस ठाण्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात जमाव जमत होता. रमजानचा महिना सुरू असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस आणि प्रशासन यांनी खबरदारी घेत जाधव यांना मुंब्रा भागात प्रवेशबंदीची नोटीस बजावली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त दादर शिवाजी पार्क येथील मेळाव्यात माहीम येथील खाडीतील बेकायदा दर्ग्याबाबत आवाज उठवला. तेथील बेकायदा बांधकामांची छायाचित्रे जाहीर केली. त्यानंतर पालिका व पोलिसांनी बेकायदा बांधकाम पाडले. त्याचवेळी मुंब्र्यातील अनधिकृत मशीद व मजार याच्यावर कारवाईचा इशारा ठाण्यातील मनसेने दिला होता.