अविनाश जाधव यांच्या मध्यस्थीने मनसेचे आमरण उपोषण आंदोलन स्थगित
By नितीन पंडित | Published: November 2, 2022 08:14 PM2022-11-02T20:14:50+5:302022-11-02T20:15:15+5:30
आंदोलनाकर्त्यांच्या काही मागण्या मान्य, १५ दिवसांत आश्वासन पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलन
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: भिवंडी महानगर पालिकेमधील शेकडो कामगारांवर प्रशासना कडून अन्याय होत असून नियम व शर्तीचा भंग करून पालिकेचा कारभार सुरू असल्याचा आरोप करत त्याविरोधात मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे भिवंडी युनिट अध्यक्ष संतोष साळवी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी महानगरपालिका मुख्यालय समोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते.बुधवारी मनसे नेते तथा ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या माध्यस्तीने साळवी यांच्या काही मागण्या मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी मान्य केल्या नंतर बुधवारी सायंकाळी उपायुक्त दीपक झिंजाड यांच्या हस्ते लिंबू शरबत पिऊन संतोष साळवी यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.
मनसेने पुकारलेल्या आमरण उपोषणाचा बुधवारी दुसरा दिवस होता.सायंकाळी अविनाश जाधव यांनी मनपा आयुक्त म्हसाळ यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी सेवा जैष्ठते प्रमाणे प्रभारी अधिकारी पदांची नियुक्त केली जाणार असून शासन निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यात येईल,सातवा वेतन आयोगाचा सन जानेवारी २०१६ पासूनचा फरक कर्मचाऱ्यांना आठ दिवसात अभ्यास करून लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल,बकरी ईदच्या कामातून कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली असून बकरी ईद चे काम कंत्रातदारांकडून करून घेण्यात येणार, निवृत्त कर्मचाऱ्यांचा १२:२४ चा फरक पुढील १५ दिवसात मार्गी लावणार या व अशा विविध मागण्या मनपा आयुक्त म्हसाळ यांनी आंदोलनाकर्त्यांच्या मान्य केल्या आहेत.या चर्चेदरम्यान आयुक्तांनी दिलेले आश्वासन पंधरा दिवसात मार्गी न लागल्या तर मी स्वतः मनपा मुख्यालयासमोर आंदोलन करेन, असा इशारा यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनपा प्रशासनाला देत साळवी यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले.
आमचे नेते अविनाश जाधव यांनी आयुक्तांशी चर्चा करून काही मागण्या मान्य केल्या आहेत तर काही मागण्या येत्या काळात मनपा प्रशासन सोडविणार असल्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले असल्याने आपले आमरण उपोषण आज स्थगित केले आहे अशी प्रतिक्रिया मनसे कामगार सेनेचे भिवंडी शराध्यक्ष संतोष साळवी यांनी दिली आहे.