अविनाश जाधव यांची राजीनामा नाट्यातून माघार; राज यांच्या आदेशानंतर निर्णय घेतल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 05:38 AM2024-12-03T05:38:29+5:302024-12-03T05:39:12+5:30
आदेशानंतर आपण हा राजीनामा मागे घेत असल्याचा एक व्हिडीओच जाधव यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सोमवारी प्रसारित केला. त्यामुळे या राजीनामा नाट्यावर अवघ्या २४ तासांमध्येच पडदा पडला आहे.
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा रविवारी राजीनामा दिला होता. त्याबाबतचे पत्रच त्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले होते. मात्र, राज
यांच्या आदेशानंतर आपण हा राजीनामा मागे घेत असल्याचा एक व्हिडीओच जाधव यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सोमवारी प्रसारित केला. त्यामुळे या राजीनामा नाट्यावर अवघ्या २४ तासांमध्येच पडदा पडला आहे.
२४ तासांत निर्णय मागे
विधानसभा निवडणुकीमध्ये जाधव यांच्यासह सर्वच्या सर्व १२ उमेदवारांना जिल्ह्यात फटका सहन करावा लागला. पालघरमध्येही मनसेचा पराभव झाला.
निवडणूक काळात जाधव यांनी पालघरमधील उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना सहकार्य केले नसल्याचा आरोप मनसे पालघरचे विक्रमगड तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी थेट राज ठाकरे यांच्याकडे केला होता.
या सर्वच पार्श्वभूमीवर जाधव यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. मात्र, या राजीनाम्याला २४ तास उलटत नाहीत तोच त्यांनी तो मागे घेतल्याचेही आता जाहीर केले आहे.