ठाणे स्थानकातील नऊ प्रवेशद्वारांना टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 01:25 AM2019-09-19T01:25:19+5:302019-09-19T01:25:22+5:30
ठाणे रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल तेवीस प्रवेशद्वार आहेत.
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल तेवीस प्रवेशद्वार आहेत. मात्र,एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवेशद्वारांची रेल्वे स्थानकाला सद्यस्थितीत गरज नाही. यामुळे सुरक्षितेच्या कारणास्तवास रेल्वे स्थानकातील नऊ प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेऊन त्यातील ठाणे पश्चिमेकडील दोन प्रवेशद्वारांना रेल्वेने टाळेही लावले आहे. हे टाळे आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यावरच तातडीने उघडण्याची व्यवस्था ठेवल्याचे ठाणे आरपीएफ पोलिसांनी सांगितले.
ठाणे रेल्वे स्थानकातून नियमित साडेतीन लाख लोकल प्रवासी तिकीटांची विक्री होत असून त्या प्रवासी संख्येसह पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास करणारी अशी सुमारे सात-आठ लाख प्रवासी दररोज ये-जा करतात. तसेच दहा फलाटांचे रेल्वे स्थानक असून आत-बाहेर करण्यासाठी तब्बल २३ प्रवेशद्वारे आहेत. त्यामध्ये पश्चिमेला १० आणि पूर्वेस ६ तसेच स्थानकाला जोडलेल्या उड्डाणपुलांना ७ प्रवेशद्वारांसह एकूण २३ अधिकृतरित्या प्रवेशद्वार आहेत. त्यामधील पश्चिमेकडील पाच आणि पूर्वेतील ४ अशा नऊ प्रवेशद्वारांना टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रवेशद्वार बंद करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. यात रेल्वेस्थानकाच्या मुख्य इमारतीचे दोन प्रवेशद्वार बंद केले आहेत. हा निर्णय पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लयानंतर गर्दीच्या रेल्वे स्थानकांना हाय अॅलर्टचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्यानंतर ठाणे रेल्वे प्रशासन आणि ठाणे आरपीएफ पोलिसांनी संयुक्तरित्या सुरक्षितेच्या दृष्टीने पाहणी करून घेतल्याची माहिती
सूत्रांनी दिली.
>रेल्वे स्थानकात २३ प्रवेशद्वारांपैकी ९ प्रवेशद्वारे बंद करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील दोन प्रवेशद्वारांना टाळे लावले आहेत. त्या प्रवेशद्वारांचे टाळे एखाद्यावेळी गर्दी झाल्यावर किंवा आपत्तीजन्य परिस्थिती ओढावल्यास ते तातडीने उघडले जाईल, अशी व्यवस्था केली आहे.
- राजेंद्र पांडव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आरपीएफ, ठाणे.