‘महापौर निवास’चा रस्ता बनवण्यास प्रशासनाची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:39 AM2019-08-30T00:39:37+5:302019-08-30T00:40:13+5:30

अतिक्रमणाकडेही डोळेझाक : बंगल्यात राहायला जाण्यावर राणे ठाम

Avoidance of administration to construct 'mayor's residence' road | ‘महापौर निवास’चा रस्ता बनवण्यास प्रशासनाची टाळाटाळ

‘महापौर निवास’चा रस्ता बनवण्यास प्रशासनाची टाळाटाळ

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या महापौरांसाठी आधारवाडी कारागृहानजीक महापालिकेने महापौर निवास बांधले आहे. मात्र, तेथे जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता प्रशासनाने अद्याप तयार केलेला नाही. त्यासाठी चार महिने पाठपुरावा करूनही रस्त्याचे काम झालेले नाही. असे असतानाही तेथे राहायला जाण्याचा निर्धार महापौर विनीता राणे यांनी केला आहे.


महापौर निवास या बंगल्यासाठी आधारवाडी कारागृहानजीक जागा आरक्षित होती. तेथे हा बंगला उभारण्यात आला आहे. या निवासासाठी अनेक महापौरांनी प्रयत्न केले. मात्र, त्यात येत असलेले अडथळे आणि कामाला होत असलेली दिरंगाई पाहता काम उशिराने मार्गी लागले आहे. या बंगल्यात राहण्याचा योग राणे यांना येणार आहे. मात्र, या निवासाकडे जाण्यासाठी असलेला रस्ता महापालिकेने तयार केलेला नाही. या रस्त्यावरील अतिक्रमण हटवले जात नाही. त्यामुळे रस्ता तयार होत नाही.
महापौर राणे यासंदर्भात चार महिन्यांपासून आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, तरीही आयुक्तांकडून हे काम केले जात नाही. महापालिकेचे अधिकारी हे अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यांना कोणाची भीती आहे, असा सवाल राणे यांनी केला आहे.


२०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी महापौर निवासाशेजारील सात एकर जागा ताब्यात घेण्यासाठी तेथील अतिक्रमण हटवण्यासाठी जोरदार कारवाई केली. महापालिकेच्या या मोकळ्या जागेवर आता लॉन्स तयार करून अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमणही हटवण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रवींद्रन यांनी जी तत्परता दाखवली होती, तीच तत्परता बोडके यांच्याकडून दाखवली जात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, रस्ता तयार झालेला नसतानाही मी महापौर निवासमध्ये राहण्यासाठी जाणार आहे, असे राणे यांनी सांगितले.

Web Title: Avoidance of administration to construct 'mayor's residence' road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.