ठाण्यात पुन्हा भरणार आठवडाबाजार
By Admin | Published: November 2, 2015 01:28 AM2015-11-02T01:28:58+5:302015-11-02T01:28:58+5:30
शहरात भरणाऱ्या आठवडाबाजारांवर कारवाई करून हे आयुक्तांनी मोकळे केले होते. परंतु, यासंदर्भात ठाणे जिल्हा हॉकर्स युनियनने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले
ठाणे : शहरात भरणाऱ्या आठवडाबाजारांवर कारवाई करून हे आयुक्तांनी मोकळे केले होते. परंतु, यासंदर्भात ठाणे जिल्हा हॉकर्स युनियनने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानुसार, न्यायालयाने आठवडाबाजारांतील फेरीवाल्यांच्या व्यवसायाला अडथळा करू नका, असे अंतरिम आदेश दिल्याची माहिती युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
कित्येक वर्षांपासून शहरातील विविध भागांत आठवडाबाजार भरत आहेत. परंतु, या माध्यमातून सोनसाखळी चोरी, गावगुंडांची दादागिरी वाढल्याने या बाजारांवर कारवाईची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समिती आणि महासभेत केली होती. त्यानुसार, गेल्या महिन्यात आयुक्तांनी या आठवडाबाजारांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यानंतर, एकाही ठिकाणी हा बाजार भरत नव्हता.
आता हळूहळू काही ठिकाणी हे बाजार पुन्हा फुलू लागले आहेत. त्यावर, पालिकेने अद्याप कारवाई केली नसल्याचे राव यांनी सांगितले. पालिका आयुक्तांनी उच्च न्यायालयाचे आदेश पाळल्याचे संकेत त्यांनी यातून दिल्याचेही त्यांनी सांगितले.