पालिकेने निधी दिल्याने आव्हाड दोनदा आमदार; सरनाईकांचे खळबळजनक वक्तव्य
By अजित मांडके | Published: March 5, 2024 05:19 PM2024-03-05T17:19:26+5:302024-03-05T17:20:19+5:30
निधी बाबत विरोधकांची नेहमीच बोंबाबोंब असते, मात्र सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव मुख्यमंत्र्यांनी पाळला नसल्याचे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी करत विरोधकांना सुनावले आहे.
अजित मांडके,ठाणे : निधी बाबत विरोधकांची नेहमीच बोंबाबोंब असते, मात्र सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव मुख्यमंत्र्यांनी पाळला नसल्याचे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी करत विरोधकांना सुनावले आहे. विरोधक म्हणून कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात महापालिकेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने ते दोनदा आमदार झाले असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले आहे. तसेच महापालिकेचे तात्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल असो या राजीव हे आयुक्त असताना आमच्यासारखे आमदारांना महापालिकेकडून निधी मिळाला नाही. मात्र आव्हाडांना निधी मिळाला, आम्हाला १० ते १५ कोटी निधी मिळायचा तेंव्हा आव्हाडांना २०० ते २५० कोटी निधी मिळायचा, असे स्पष्ट करत, सरनाईक यांनी विरोधकांचे निधीबाबत होत असलेले आरोप खोडसर असल्याचेही स्पष्ट केले.
मंगळवारी सरनाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वक्तव्य केले. महापालिका आयुक्त बांगर हे हे कार्यक्षम अधिकारी आहेत. ते जेव्हा महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर ६० ते ७० टक्के कर्ज फिटले गेले आहे. उर्वरित कर्ज हे पुढील वर्षभरात फिटले जाईल असे स्पष्ट करताना सरनाईकांनी आगामी लोकसभा, त्यानंतर येणाऱ्या विधानसभा आणि महापालिका या निवडणुकीनंतर महापालिकेची आर्थिक स्थिती एम एम आर क्षेत्रातील इतर महापालिकांपेक्षा निश्चितच अधिक सक्षम झालेली दिसेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विरोधक नेहमीच महापालिकेतून निधी मिळत नसल्याबाबत तक्रार करत असतात, मात्र त्यांचे हे आरोप निश्चितच खोडसर असल्याचे सांगून विरोधक आमदार जितेंद्र आव्हाड यांना महापालिका प्रशासनाने दिलेल्या निधीबाबत उहापोह केला आहे. मात्र सरनाईक यांनी त्यांना मिळालेल्या निधीपेक्षा निश्चितच आव्हाडांना जास्त निधी महापालिकेने दिला असल्याचा दावा केला. त्या निधीच्या कामावरून दोनदा आव्हाड हे आमदार झाले असल्याचेही म्हटले आहे. तर मुख्यमंत्री हे निधी वाटपामध्ये सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव पाळत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.