पोखरण रोड येथील कोविड रुग्णालय उभारणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:42 AM2021-04-02T04:42:22+5:302021-04-02T04:42:22+5:30

ठाणे : गेल्या महिनाभरात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली आहे. यामुळे सध्या खासगी रुग्णालयांमधील बहुतांश बेड भरले आहेत. दुसऱ्या लाटेचा ...

Awaiting construction of Kovid Hospital at Pokhran Road | पोखरण रोड येथील कोविड रुग्णालय उभारणीच्या प्रतीक्षेत

पोखरण रोड येथील कोविड रुग्णालय उभारणीच्या प्रतीक्षेत

Next

ठाणे : गेल्या महिनाभरात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली आहे. यामुळे सध्या खासगी रुग्णालयांमधील बहुतांश बेड भरले आहेत. दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची उपाययोजना म्हणून पोखरण रोड क्रमांक दोन व्होल्टास येथे एक हजार बेडचे कोरोना रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जूनमध्ये केली होती. त्यानंतर टेंडर काढून, टेंडरच्या रकमेत दहा कोटींची वाढ करण्यात आली. सहा महिने उलटूनही या ठिकाणी रुग्णालय उभे राहिले नसल्याची माहिती मनसेच्या जनहित व विधि विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी दिली.

रुग्णालयात बेड मिळण्यासाठी रुग्ण झगडत आहेत. अशावेळी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य ठाणेकरांना बसत आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग पसरला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अक्षरश: कोलमडून गेली. ऑक्सिजन, बेडच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातलगांचे अतोनात हाल झाले. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शिंदे यांनी २५ जून २०२० रोजी पोखरण रोड क्रमांक दोन व्होल्टास येथे एक हजार बेडचे रुग्णालय उभारण्याची घोषणा केली. सिडकोच्या माध्यमातून हे रुग्णालय उभारले जाणार होते. या रुग्णालयात ऑक्सिजन बेड, नॉन ऑक्सिजन बेड, डायलिसिस सेंटर, अतिदक्षता विभागासह व्हेंटिलेटर, आदींची सुविधा पुरविली जाणार होती. यासाठी ऑगस्ट २०२० मध्ये निविदा काढण्यात आली; पण या रुग्णालयाच्या उभारणीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. १२ कोटींच्या हॉस्पिटलचे काम सुमारे २३ कोटींच्या घरात गेले. तरीही हे हॉस्पिटल कार्यान्वित झालेले नाही. दोन महिन्यांमध्ये होणाऱ्या रुग्णालयाचे काम सहा महिने उलटूनही पूर्ण झालेले नाही. यात प्रशासनाचा तसेच सिडको व्यवस्थापनाचा गलथान कारभार निदर्शनास येत आहे, असे मनसेचे म्हणणे आहे.

सध्याच्या घडीला दररोज हजारांच्या घरात कोरोना रुग्ण आढळत आहेत. खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे नव्याने आढळणाऱ्या रुग्णांना बेड मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. ठाण्यातील रुग्णांसाठी हे रुग्णालय तातडीने सुरू करण्याची मागणी महिंंद्रकर यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

........

Web Title: Awaiting construction of Kovid Hospital at Pokhran Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.