भूकंपामुळे रात्र काढली जागून, काही कुटुंबांचा नातेवाइकांकडे आश्रय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 08:51 AM2022-12-03T08:51:52+5:302022-12-03T08:52:12+5:30
प्रशासनाने उभारला तंबू : काही कुटुंबांनी घेतला नातेवाइकांकडे आश्रय
लाेकमत न्यूज नेटवर्क
शेणवा : शहापूर तालुक्यातील वेहळोली खुर्द गावाला दहा दिवसांपासून बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची वारंवारता वाढत आहे. शुक्रवारी पहाटेपर्यंत सहा धक्के नागरिकांनी अनुभवले. भूकंपाच्या भीतीमुळे रात्र जागून काढणाऱ्या वेहळोलीकरांसाठी प्रशासनाने तात्पुरत्या तंबूची व्यवस्था केली आहे.
धास्तावलेल्या वेहळोतीलील काही कुटुंबांनी घरे सोडून नातेवाइकांकडे आसरा घेतला आहे. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शुक्रवारी वेहळोलीला भेट देऊन ग्रामस्थांना धीर दिला. सोगावजवळ काळू नदीपात्रात (डोंगरी वस्तीशेजारी) भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती मिळाल्यापासून किन्हवली, सोगाव परिसरात नागरिकांत भूकंपाबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, भिवंडी प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी वेहळोलीतील नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. गुरुवारी प्रांताधिकाऱ्यांनी सायंकाळी ५.०४ वाजता स्वतः भूकंपाचा धक्का अनुभवला. त्यानंतर त्यांनी चिखलगाव, मोहिपाडा, कातकरी वस्त्या, बर्डेपाडा, शिरवंजे, खरिवली, कानडी, शिवाजीनगर या गावांना भेटी दिल्या.
पाणीसाठा कमी करण्याच्या सूचना
आमदार दौलत दरोडा यांनीही वेहळोली ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वेहळोली लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या सूचना लघु पाटबंधारे प्रशासनाला दिल्या. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, कृषी सभापती संजय निमसे, मारुती धिर्डे यांनीही वेहळोली ग्रामस्थांना धीर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
तलाठी, ग्रामसेवक शहापूरमध्ये ठाण मांडून
ग्रामसेवक घटनास्थळी ठाण मांडून आहेत. दिवसभरात ५ ते ६ धक्के बसत असल्याने नागरिक दहशतीखाली रात्र जागून काढत आहेत. बर्डेपाडा, खरिवली, नांदगाव, सावरोली, बेलकडी येथे गुरुवारी व शुक्रवारी धक्के जाणवले. वेहळोलीतील काही कुटुंबे राहते घर सोडून नातेवाइकांकडे स्थलांतरित झाली असल्याची माहिती ग्रामस्थ सुनील निमसे यांनी दिली.