‘ग्रोथ सेंटरबाबत जागृती करा’
By admin | Published: February 21, 2017 05:27 AM2017-02-21T05:27:07+5:302017-02-21T05:27:07+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांपैकी १० गावे राज्य सरकारने ग्रोथ सेंटर म्हणून जाहीर
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांपैकी १० गावे राज्य सरकारने ग्रोथ सेंटर म्हणून जाहीर केली आहेत. त्यामुळे ती एमएमआरडीएच्या अधिपत्याखाली आली आहेत. या ग्रोथ सेंटरबाबत जागृती करा, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा सर्वपक्षीय युवा मोर्चाने एमएमआरडीएला दिला आहे.
राज्य सरकारच्या ३० एप्रिल २०१६ च्या अधिसूचनेनुसार २७ गावांपैकी १० गावे ग्रोथ सेंटर म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये विकासाभिमुख प्रकल्प राबवले जात आहेत. याबाबत, स्थानिक भूमिपुत्र अनभिज्ञ असल्याचे युवा मोर्चाचे म्हणणे आहे. ग्रोथ सेंटर घोषित होऊन नऊ महिने उलटूनही या विकासाभिमुख प्रकल्पांविषयी जागृती झालेली नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. १० गावांमधील स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी बाधित होत आहेत. विकासाला आमचा विरोध नाही, परंतु आजपर्यंत या प्रकल्पांविषयी सरकारचे धोरण स्पष्ट झालेले नाही.
ग्रोथ सेंटरबाबत लवकरात लवकर जागृती करण्यासाठी शिबिराचे आयोजन करून बाधित जमिनीच्या मोबदल्याचे स्वरूप स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा आपल्या कार्यालयावरही आंदोलन छेडले जाईल, असा इशारा एमएमआरडीएला दिला आहे. याआधीही दोन वेळा पत्रव्यवहार केल्याचे युवा मोर्चाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)
भूमिपुत्र अनभिज्ञ
स्थानिक भूमिपुत्रांना ग्रोथ सेंटर म्हणजे काय, हे अजूनही कळलेले नाही. हा प्रकल्प भूमिपुत्रांच्या हिताचा आहे की बिल्डरधार्जिणा, असा सवालही उपस्थित होत आहे. धोरण स्पष्ट न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व द्वेषाचे वातावरण पसरले आहे, असे युवा मोर्चाने पत्रात म्हटले आहे.