जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाची जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:50 AM2018-08-20T03:50:49+5:302018-08-20T03:51:05+5:30
देश व राज्यपातळीवर स्वच्छतेत ठाणे जिल्ह्याचा अव्वल क्रमांक आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने गावागावांत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
ठाणे : देश व राज्यपातळीवर स्वच्छतेत ठाणे जिल्ह्याचा अव्वल क्रमांक आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने गावागावांत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये गावातील सार्वजनिक ठिकाणी संबळवाद्यासह कला पथकाद्वारे गावकऱ्यांची स्वच्छ सर्वेक्षणाची अॅपवर कशी नोंद करावी, यासाठी मार्गदर्शन केले जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले.
केंद्र शासनाच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण २०१८’ चे आयोजन केले आहे. या सर्वेक्षणाची माहिती जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेला सहज-सोप्या पद्धतीने समजावी, यासाठी कला पथकाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये प्रचार-प्रसाराचे काम हाती घेण्यात आले. यासाठी सर्व तयारी पूर्ण करून गावागावांत जनजागृती सुरू असल्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले.
३१ आॅगस्टपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. स्वच्छतेसंदर्भातील घटकांबाबत हे सर्वेक्षण सुरू असून त्यासाठी गुणांकनपद्धती निश्चित झाली आहे. या सर्वेक्षणात सार्वजनिक स्तरावरील स्वच्छता घटकांचा समावेश आहे. सर्वात जास्त गुण मिळवणाºया जिल्ह्यांना राष्ट्रीय पातळीवर २ आॅक्टोबर रोजी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. प्ले स्टोअरमधून एसएसजी १८ हे अॅप डाउनलोड करून तेथे जिल्ह्याबाबत अभिप्राय नोंदवायचा आहे.