जलसंकटाची जाणीव अन जनजागृती
By admin | Published: March 21, 2016 01:32 AM2016-03-21T01:32:54+5:302016-03-21T01:32:54+5:30
जिल्ह्यावरील भीषण पाणीटंचाईची जाणीव आता नागरिकांना झाली असून या समस्येचा मुकाबला कसा करायचा, याबाबत जनजागृती करण्याकरिता विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष
जिल्ह्यावरील भीषण पाणीटंचाईची जाणीव आता नागरिकांना झाली असून या समस्येचा मुकाबला कसा करायचा, याबाबत जनजागृती करण्याकरिता विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष, व्यक्ती यांच्याकडून पुढाकार घेतला जात आहे. ठाण्यातील नागरिकांनी घरटी पाण्याचे मीटर बसवले तर पाण्याचा वापर २० टक्कयांनी कमी होईल, अशी सूचना केली आहे. तर, डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आस्थापनांमधून फेरीवाल्यांकडून होणाऱ्या पाणीचोरीचा पर्दाफाश केला आहे. मीरा-भार्इंदर पालिकेकडे पाणीटंचाईचा मुकाबला करण्याचा कृती आराखडाच नसल्याचे उघड झाले आहे. तर, उल्हासनगरमध्ये उल्हास नदीतील जलपर्णी काढून पाण्याचा वापर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सोमवार, २१ मार्च रोजी ठाण्यात पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी जलदौडचे आयोजन केले आहे.
वापरावरील नियंत्रणासाठी घरटी मीटर बसवा
ठाणे : घरोघरी मीटर बसवून महानगर गॅसकडून गॅसचा पुरवठा केला जातो त्याच धर्तीवर घरटी मीटर बसवून पाणीपुरवठा केला तर पाण्याच्या अनिर्बंध वापरावर नियंत्रण राहू शकेल. यामुळे २० टक्क्यांपेक्षा अधिक पाण्याची बचत होईल, असे मत जागरुक नागरिकांनी व्यक्त केले.
सध्या भीषण पाणीटंचाईला सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. पाणी बचतीसाठी प्रशासन पातळीवर उपाय केले जात असताना जागरुक नागरिकांनी देखील यात पुढाकार घेण्यास सुरूवात केली आहे. पाण्याची चणचण कमी करण्याकरिता वैयक्तिक पातळीवर कोणत्या उपाययोजना करता येईल, याची चाचपणी सोसायट्यांमध्ये सुरू आहे. याच अनुषंगाने ठाणे सिटीझन व्हॉइसच्यावतीने शनिवारी हिरानंदानी मेडोजच्या क्लब हाऊसमध्ये वॉटर समीटचे आयोजन केले होते. यासाठी शहरातील सर्व सोसायट्यांतील नागरिकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पाणीबचतीचे उपाय, बोअरवेल, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सोसायट्यांच्या काही सभासदांनी उपाय तर काहींनी सूचना मांडल्या. बोअरवेल आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचे अभ्यासक संदीप अध्यापक, डॉ. रामकृष्णन आणि विद्या भाजेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)
आज जलदौड
जलजागृती सप्ताहानिमित्त ठाण्यामध्ये सोमवारी सकाळी साडेसहा वाजता जलदौड अभियान हाती घेण्यात आले आहे. यात ठाणेकरांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाणीबचतीचा संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथून या जलदौडला प्रारंभ होणार आहे. या वेळी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी, लघुस्ािंचन अधीक्षक उप्पलवाड आदी उपस्थित राहून या जलदौड अभियानातील स्पर्धकांना झेंडा दाखवणार आहेत.
कृती आराखडाच नाही
मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी महापालिकेने कृती आराखडाच तयार केला नाही. पाणीकपात रद्द करा व अतिरिक्त पाणी द्या, या मागणीव्यतिरिक्त सत्ताधारी व प्रशासन मात्र अनधिकृत नळजोडण्या, टँकरलॉबी, पाण्याची काळ्याबाजारातील विक्री, कागदावरील रेन वॉटरहार्वेस्टिंग योजना, पाणीउपसा याविरोधात ठोस पावले उचलण्यास टाळाटाळ करत आहे.
मीरा-भार्इंदरला सध्या स्टेमकडून ८६ तर एमआयडीसीकडून ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मंजूर आहे. कपातीमुळे गुरुवार व शुक्रवार असा दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. शिवाय, अन्य दिवशीही स्टेमकडून ७२ व एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणी प्रत्यक्षात मिळते. १५ वर्षांत शहरातील लोकसंख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली असली तरी पाणीपुरवठा मात्र फारसा वाढलेला नाही. त्यामुळे नागरिकांना तीन ते चार दिवसांनी पाणी मिळत आहे. असे असले तरी सत्ताधारी, विरोधक व प्रशासन मात्र मुख्यत्वे पाणीकपात रद्द करणे व अतिरिक्त पाणीपुरवठा मंंजूर करणे, यासाठीच धावाधाव करत आहेत. पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्यावर आता पालिकेला जलजागृती करण्याची उपरती झाली आहे.
२०११ पासून नवीन नळजोडण्या देणे पालिकेने बंद केले आहे. शहरातील बांधकामे बंद करण्याचा निर्णय घेण्याचे धाडस राजकारणी व प्रशासन दाखवत नाही. नवीन नळजोडण्या बंद असताना मोठ्या संख्येने झालेली बांधकामे व त्यांना पाणी कुठून मिळते, याचा शोध घेण्यास कुणीही तयार नाही. अनधिकृत नळजोडण्या सर्रास दिल्या जात आहेत. एका अनधिकृत नळ जोडणीसाठी १० ते १५ लाख रुपये घेतले जातात. अनधिकृत नळजोडणी निदर्शनास आणूनही पाणीपुरवठा विभाग कारवाई करत नाही. केलीतर थातूरमातूर करतात. आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला नळजोडण्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन चार महिने झाले तरी पाणीपुरवठा विभाग त्याला दाद देत नाही. (प्रतिनिधी) महापालिकेच्या पाण्याची सर्रास काळ्या बाजारात विक्री होत आहे. दीड ते दोन हजार रुपये ५०० लीटर पाण्यासाठी घेतले जातात. काळ्या बाजाराने विकणारे २५० पेक्षा जास्त टेम्पो धावत असूनही कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. टाकीवरून रोज २७५ ते ३०० मोठे टँकर भरले जात आहे. टँकर लॉबीमध्ये राजकारण्यांचे हितसंबंध असल्याने पाणीउपसा व त्या पाण्यासाठी उकळले जाणारे अवास्तव पैसे यावर नियंत्रण ठेवण्यास कुणीही तयार नाही. ८०० रुपयांना मिळणारा टँकर आता तीन ते चार हजारांनामिळत आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेचा पाणीपुरवठा विभागाने बट्ट्याबोळ केला केला आहे. केवळ रिंगवेलचा खड्डा पाहून खोटे ना-हरकत दाखले देण्यात आले आहेत. यात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. ना-हरकत दिल्यानंतरही ते सुरूअसल्याची पडताळणीसुद्धा केली जात नाही. आज जर ही यंत्रणा प्रभावीपणे सुरू असती तर नागरिकांना सध्या इतकी झळ बसली नसती.
महासभेतही पाणीटंचाईचे पडसाद
शनिवारी महासभेत २७ गावांत पाणी नियमित येत नाही. कमी दाबाने येते. कपात जास्त असल्याने नागरिकांना पाणीच मिळत नाही, याकडे भाजपा नगरसेवक रमाकांत पाटील यांनी लक्ष वेधले, तर काँग्रेस पक्षाचे गटनेते नंदू म्हात्रे यांनी पाण्याचे टँकर हे रिजन्सी गृहसंकुलास पुरवले जातात.
पाणीटंचाईग्रस्त भागाला टँकर दिला जात नाही, अशी तक्रार केली. शिवसेनेच्या नगरसेविका माधुरी काळे यांनी सांगितले की, त्यांच्या प्रभागात व नगरसेविका शीतल भंडारी यांच्या प्रभागात महापालिकेने बोअरवेल खोदली आहे.
एका बोअरवेलला साखळी लावली नाही तर दुसऱ्या बोअरवेलला हॅण्डपंप बसवलेला नाही. त्यामुळे बोअरवेलचा वापर होऊ शकत नाही. याबाबत, विचारणा केली असता कंत्राटदाराला बिले दिली जात नाहीत.
पाणीचोरी करणाऱ्या फेरीवाल्यांवर मनसेची धाड
डोंबिवली : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या मालमत्तेमधून फेरीवाल्यांकडून होणारी पाणीचोरी रविवारी मनसेने उघड केली. पाणीटंचाईने नागरिक होरपळले असताना त्यांच्यावर पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र, त्याच वेळी महापालिकेच्या मालमत्तेतून होणाऱ्या पाणीचोरीकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. याकडे मनसेने लक्ष वेधले. पाणीचोरी महापालिकेने रोखली नाही तर मनसे स्टाइलने आंदोलन करून पाणीचोरांना धडा शिकवू, असा इशारा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिला आहे.
शहराच्या पूर्व भागातील पूजा-मधुबन सिनेमासमोर असलेल्या उर्सेकरवाडीतील भाजी मंडईतील पाण्याच्या टाकीतून चहावाला, सरबत तयार करणारे फेरीवाले पाइप लावून पाणी भरत होते. ते त्याचा वापर व्यवसायाकरिता करीत होते. आज मनसेचे कदम यांनी फेरीवाल्यांकडून होत असलेल्या पाणीचोरीचा प्रकार उघडकीस आणला. फेरीवाले हे परप्रांतीय असून ते मराठी माणसाच्या तोंडचे पाणी पळवत आहेत. उर्सेकरवाडीतील भाजी मंडईप्रमाणेच डोंबिवली सावळाराम महाराज क्रीडा संकुलातून तेथील फेरीवाले पाण्याची चोरी करीत आहेत.
कल्याण स्पोर्ट कॉम्प्लेक्समधूनही फेरीवाले पाण्याची लूट करीत आहेत. या महापालिकेच्या मालमत्ता आहेत. त्यातून पाणीचोरी सुरू आहे. त्याकडे प्रभाग अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. प्रभाग अधिकाऱ्यांनी पाणीचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करून ती रोखली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला.
कपात कमी झाली
तरी पाणी जपून वापरा
भार्इंदर : शहरातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी करण्यासाठी राज्य सरकारने शहराला स्टेमद्वारे २५ एमएलडी पाणी तात्पुरते मंजूर केले असले तरी पाण्याचा वापर जपून करा, असे आवाहन आयुक्त अच्युत हांगे यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक आसिफ शेख यांनी रविवारी येथील सेकंडरी शाळेच्या प्रांगणात पाणी वाचवा, जीवन वाचवा संकल्पनेवर आधारित झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.
जलतज्ज्ञ हरबितसिंग बिट्टा यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक गृहसंकुलाने रिंगवेल निर्माण करण्याची आवश्यकता असल्याची गरज व्यक्त केली. रिंगवेलद्वारे दिवसाला किमान १५ हजार ते १ लाख लीटर पाणी मिळते.
उल्हास नदीतील जलपर्णी काढायला सुरुवात उल्हासनगर : सेंच्युरी रेयॉन कंपनीजवळील उल्हास नदीपात्रातील वनस्पती, शेवाळ व कचरा काढण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. आयुक्त मनोहर हिरे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नदीपात्राची पाहणी केली. जलपर्णी काढण्यासाठी नाशिकहून अद्ययावत मशीन मागवल्याचे आयुक्तांनी सांगितले. उल्हास नदीपात्रातून पाणी उचलून शहरासह ग्रामीण परिसर, कल्याण, भिवंडी, कल्याण परिसरातील २१ लाख लोकसंख्येला एमएमआरडीएसह स्थानिक संस्था पुरवते. मात्र, नदीच्या पाण्याची पातळी खालावल्याने पात्रात वनस्पती, शेवाळ, कचरा जमा झाला आहे. त्याच ठिकाणी शहरातून वाहणारा सांडपाण्याचा खेमाणीनाला मिळत असल्याने पाणी प्रदूषित होते. पाटबंधारे विभागासह एमएमआरडीएने नदीपात्रातील वनस्पतीसह कचरा व शेवाळ काढण्याची विनंती पालिकेला केली होती. आयुक्त हिरे यांनी पाणीपुरवठा विभागाला नदीपात्रातील हिरवळ, वनस्पती, शेवाळ व कचरा काढण्याचे आदेश दिले. जेसीबी मशीन व कामगारांच्या मदतीने जलपर्णी, शेवाळ, कचरा काढला जात आहे.