मालमत्ता विभागाचा अजब कारभार
By admin | Published: January 5, 2017 05:37 AM2017-01-05T05:37:44+5:302017-01-05T05:37:44+5:30
महापालिकेच्या मालमत्ता विभागात शहरातील बऱ्याच पालिकेच्या मालमत्तेची नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. बांधकाम विभागाने पालिकेची मालमत्ता हस्तांतरीतच केलली नाही.
भिवंडी : महापालिकेच्या मालमत्ता विभागात शहरातील बऱ्याच पालिकेच्या मालमत्तेची नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. बांधकाम विभागाने पालिकेची मालमत्ता हस्तांतरीतच केलली नाही. अशा स्थितीत मालमत्तेच्या नोंदीची शहानिशा न करता दरवर्षी आॅडिट होत आहे याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या सर्व प्रकारच्या स्थावर व जंगम मालमत्तेची नोंद मालमत्ता विभागात होणे अपेक्षित असताना केवळ पालिकेच्या काही इमारतींची नोंद केलेली आहे. शहरातील पालिकेच्या इमारती बांधकाम विभागाकडून बांधल्या जातात. मात्र या इमारतींची मालमत्ता विभागाकडे नोंदच केली जात नाही. काही वर्षापूर्वी एमएमआरडीच्या निधीतून स्वच्छतागृहे बांधण्यात आली. त्यानंतर या वास्तूंचा वापर करण्याच्या निमित्ताने आरोग्य विभागाकडे सोपविणे गरजेचे असताना त्या स्वत:कडे ठेऊन गैरकारभार केला. हा गैरकारभार उघडकीस आल्यानंतर ही स्वच्छतागृहे पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडे सोपविण्यात आली. मात्र या वास्तू पालिकेच्या असतानाही त्याची नोंद मालमत्ता विभागाकडे नाही.
पालिका आर्थिक संकटात असताना त्यासाठी नगरसेवक वा प्रशासनाने कोणताही ठोस मार्ग न काढता पालिकेची मालमत्ता गहाण ठेवण्याकडे लक्ष वेधले आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. मात्र हे करताना मालमत्ता अधिकाऱ्यांचा शेराही घेतलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या निवासांबाबतची नोंद मालमत्ता विभागाकडे होत नाही. (प्रतिनिधी)