ऐन कामाच्या वेळेत कल्याण आरटीओची यंत्रणा हँग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 01:05 AM2020-03-05T01:05:04+5:302020-03-05T01:05:08+5:30
कल्याण आरटीओ कार्यालयातील लर्निंग लायसन्ससंदर्भात वाहनचालकांची लेखी चाचणी घेणाऱ्या संगणक प्रणालीत बुधवारी तांत्रिक अडथळे आल्याने ती काही काळ बंद पडली होती.
डोंबिवली : कल्याण आरटीओ कार्यालयातील लर्निंग लायसन्ससंदर्भात वाहनचालकांची लेखी चाचणी घेणाऱ्या संगणक प्रणालीत बुधवारी तांत्रिक अडथळे आल्याने ती काही काळ बंद पडली होती. त्याचा फटका सुमारे १०० नागरिकांना बसून कार्यालय परिसरात उन्हामध्ये ताटकळत राहावे लागले.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा प्रकार दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. संगणक प्रणाली अचानक बंद पडल्याने लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आलेले वाहनचालक भरउन्हात ताटकळले होते. साधारण दीड तासांनतर तांत्रिक अडथळा दूर झाल्यानंतर प्रक्रिया सुरळीत होऊन, खोळंबलेल्या नागरिकांची गैरसोय दूर झाली. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी सांगितले की, काही वेळासाठी संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक अडथळा आला होता. परंतु, तो संबंधित अभियंत्यांनी दूर केला.