अयोध्या राम मंदिर पायाभरणी कार्यक्रम; हिंदू बांधव पेढे वाटून करणार आनंद साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 07:52 PM2020-08-03T19:52:04+5:302020-08-03T19:52:35+5:30

या  कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Ayodhya Ram Temple Foundation Program; Hindu brothers will celebrate by distributing benches | अयोध्या राम मंदिर पायाभरणी कार्यक्रम; हिंदू बांधव पेढे वाटून करणार आनंद साजरा

अयोध्या राम मंदिर पायाभरणी कार्यक्रम; हिंदू बांधव पेढे वाटून करणार आनंद साजरा

googlenewsNext

नितीन पंडित

भिवंडी - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अखेर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या येथील राम मंदिर पायाभरणी कार्यक्रम बुधवारी 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाबाबत शहरात हिंदू बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे, तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे, अशी भावना येथील मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या  कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भिवंडी शहर हे संवेदनशील शहर म्हणून देहभर ओळखले जाते. मागील अनेक वर्षांपासून सर्वधर्म समभाव व जातीय सलोख्याची भावना येथील हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये रुजल्याने शहराची ही संवेदनशील म्हणून असलेली ओळख हळूहळू पुसू लागली आहे. मात्र मागील काही जातीय दंगलींचा इतिहास या शहराला असल्यामुळे तसेच शहरात मुस्लिम बांधवांची संख्या देखील जास्त असल्याने या शहराकडे आजही अतिसंवेदनशील शहर म्हणूनच पहिले जात आहे. त्यामुळे धार्मिक सण उत्सवांमध्ये शहरात पोलीस यंत्रणा नेहमीच सतर्क असते.

बुधवारी अयोध्या येथील राम मंदिराच्या पाया भरणीचा कार्यक्रम होणार आहे. श्रीराम हे समस्त हिंदू बांधवांचे दैवत आहेत, त्यातच मागील अनेक वर्षांपासून या राम मंदिराच्या निर्माणाचा निर्णय प्रलंबित असल्याने हिंदू बांधवांमध्ये सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांबाबत नाराजी होती. आता राम मंदिर उभारणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने हिंदू बांधव या पायाभरणीच्या दिवशी शहरात पेढे वाटून, घरी दिवे लावून व ध्वज फडकवून आपला आनंद व्यक्त करणार आहेत. सध्या देशभर कोरोनाचे संकट असल्याने हिंदू बांधव आपल्या घरीच हा आनंदोत्सव साजरा करणार आहेत.

मात्र जर कोरोना संकट नसते तर या उत्सवासाठी आयोध्यात हिंदू बांधवांनी एकच गर्दी केली असती अशी भावना काही हिंदू बांधवांनी व्यक्त केली आहे. तर पायाभरणी नंतरही या मंदिराच्या निर्माणात कोणतेही राजकारण न करता भव्य असे राम मंदिर लवकरात लवकर निर्माण करावे अशीही प्रतिक्रिया काही हिंदू बांधवांनी दिली आहे. दुसरीकडे शहरातील अनेक मुस्लिम बांधवांना बुधवारी होणाऱ्या राम मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमाबाबत माहिती देखील नाही. तर काहींनी पूर्वी मुस्लिम बांधवांमध्ये अशिक्षितपणा व जनजागृतीचा अभाव असल्याने दंगलीसारख्या घटना घडत होत्या.

आता शहरात तशी परिस्थिती राहिली नसून हिंदू बांधव ईदमध्ये सहभागी होत आहेत तर हिंदूंच्या सणांमध्ये मुस्लिम बांधव देखील सहभागी होत असल्याने कट्टरतावाद कमी झाला असून लोकांमध्ये सामाजिक जाणिव निर्माण झाली असल्याने आयोध्यातील राम मंदिर निर्माणा विषयी मुस्लिम बांधव आता कोणतीही जहाल प्रतिक्रिया देत नाहीत. तर काही मुस्लिम बांधवांनी आम्ही या देशाचे नागरिक असून देशावर व देशातील संविधानावर प्रेम करतो व त्याचा आदर करतो , त्यातच राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असल्याने आपल्या भावना व्यक्त करण्यात आता अर्थ नाही कारण सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च स्थानी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा व संविधानाचा मान राखणे आपले आद्य कर्तव्य आहे त्यामुळे राम मंदिराच्या निर्णयाचे मुस्लिम बांधव म्हणून आपण स्वागत व समर्थन करणारच अशी प्रतिक्रिया देखील अनेक मुस्लिम बांधवांनी दिली आहे. 

दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी शहरातील सहाही पोलीस ठाण्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून एसआरपीएफची एक तुकडी व वाहतूक शाखेचे शंभर पोलीस शहरात तैनात करण्यात आले आहेत मात्र सध्या शहरात शांतता असून नागरिकांमध्ये सामंजस्याची व सहकार्याची भावना आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. 

Web Title: Ayodhya Ram Temple Foundation Program; Hindu brothers will celebrate by distributing benches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.