अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 01:05 AM2019-11-10T01:05:43+5:302019-11-10T01:05:53+5:30
सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आयुक्तालयात तसेच ठाणे ग्रामीण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ठाणे / कल्याण : अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आयुक्तालयात तसेच ठाणे ग्रामीण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेल्वेस्थानके, गर्दीच्या ठिकाणांसह संवेदनशील भागांतही पोलिसांनी सर्वधर्मीयांना विश्वासात घेतल्याने शनिवारी दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळांतील ३३ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील संवेदनशील ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून बंदोबस्त ठेवलेला आहे. मुंब्रा, राबोडी आणि भिवंडी याठिकाणी बंदोबस्तासह गस्तही वाढविण्यात आली.
शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी पथसंचलनही केले. अनेक मोक्याच्या ठिकाणी चौकाचौकांमध्ये साध्या वेशातील पोलीसही तैनात होते. शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून ठाणे शहर आयुक्तालयात पोलीस बंदोबस्तासह राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्याही तैनात केल्या होत्या. याशिवाय, निकाल कोणाच्या बाजूने अथवा विरुद्ध लागला तरी कोणाच्या भावना दुखावल्या
जातील, असे कृत्य करूनका, असे आवाहन पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या पातळीवर घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये करण्यात आले होते.
या बैठकांमध्ये मुंब्रा, राबोडी आणि भिवंडीतील हिंदू-मुस्लिम संघटनांशी चर्चा करून मौलाना आणि पुरोहितांनाही विश्वासात घेतले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
।ठाणे स्थानकात प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी
मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या ठाणे रेल्वेस्थानकातही विशेष सुरक्षा वाढविली आहे. गर्दीचा गैरफायदा घेऊन कोणीही गैरप्रकार करू नये म्हणून रेल्वेस्थानकामध्ये तपासणी करण्यात येत होती. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांसह दंगल नियंत्रण पथकही रेल्वेस्थानक, बसस्थानक तसेच गर्दी आणि मोक्याच्या ठिकाणी तैनात ठेवले होते. अनेक ठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी संशयास्पद वाहनांची, प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी केली.
>ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर सोमवारपर्यंत सुरक्षा कडक
ठाणे ग्रामीणमधील गणेशपुरी, मुरबाड, शहापूर, भार्इंदर आणि मीरा रोड या पाच विभागांतील १७ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील पडघा, बोरिवली आणि मीरा रोडमधील नयानगरसह संपूर्ण ठाणे ग्रामीण भागात कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला होता. पोलीस मुख्यालयातील ५०० कर्मचारी, राज्य राखीव दलाची एक कंपनी आणि गृहरक्षक दलाच्या ३०० जवानांचा यामध्ये समावेश आहे. रविवारी होणाऱ्या ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त सोमवारपर्यंत ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>अयोध्या प्रकरणाच्या निकालाचे मुंब्य्रात स्वागत
मुंब्रा : अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे मुस्लिमबहुल मुंब्य्रातील रहिवाशांनी स्वागत केले. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा फैसला झाला. हा वाद अखेर संपुष्टात आल्याबद्दल काहींनी समाधान व्यक्त केले. शाहिद हुसेन, वाहिद शेख यांनी मात्र निकालाबाबत असमाधान व्यक्त करून मशिदीला इतरत्र जागा देण्यात आल्याबाबत खेद प्रकट केला. या निकालाबाबत पूर्णपणे समाधानी असल्याची प्रतिक्रि या सलीम पठाण या तरु णाने दिली. दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर येथील रेल्वेस्थानक परिसर, संजयनगर, अमृतनगर, कौसा आदी परिसरात सकाळपासून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
>अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण भागात पडघा, बोरिवली, नयानगर या संवेदनशील भागांसह सर्वत्र कडेकोट बंदोबस्त आहे. व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावरही पोलिसांनी नजर ठेवली. त्याद्वारेही कोणीही वादग्रस्त पोस्ट कोणालाही न पाठवण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
-डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण
>सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. पण, त्याआधीच गेल्या सात दिवसांपासून ठाणे पोलिसांनी हिंदू-मुस्लिम संघटनांच्या मौलाना आणि पुरोहितांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेतले. कोणताही निकाल आला तरी अनुचित प्रकार करू नये. शांतता राखण्याचे आवाहन केले होते. त्याला मुंब्रा, भिवंडी आणि राबोडी तसेच सर्व ठिकाणच्या नागरिकांनी उत्स्फूर्त सहकार्य केले.
- विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर