दि. बा. पाटील नामकरण आंदोलनामुळे वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:13+5:302021-06-25T04:28:13+5:30
ठाणे : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी गुरुवारी नवी मुंबईत प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन ...
ठाणे : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी गुरुवारी नवी मुंबईत प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे ठाण्यातील शीळफाटा, मुंबई-नाशिक महामार्गावरील आनंदनगर, माजीवडा, साकेत पूल आदी भागात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांचे हाल झाले. तर खबरदारी म्हणून ८७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी गुरुवारी ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील काही आगरी-कोळी बांधव या आंदोलनात सहभागी होणार होते. त्यामुळे ठाणे पोलिसांनी या भागातील ४७० जणांना बुधवारी नोटिसा बजावल्या होत्या, तसेच या भागातून आंदोलक नवी मुंबईत जाऊ नये, यासाठी ठाणे पोलिसांनी मुख्य मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर नाकाबंदी सुरू केली होती. तरीही काही आंदोलक नवी मुंबईच्या दिशेने सकाळी लवकरच गेले होते. त्यामुळे ठाणे शहरातील अनेक आंदोलक नवी मुंबईत पोहोचले होते. तर गुरुवारी सकाळी आंदोलनाला जाण्याच्या तयारीत असलेल्या ८७ जणांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन संपल्यानंतर सोडून दिले.
या कालावधीत नवी मुंबईत वाहतूक बदल केले होते. त्यामुळे ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक ठाणे पोलिसांनी घोडबंदर येथील गायमुख, भिवंडी येथील चाविंद्र, नदीनाका, पडघा खिंड , बदलापूर, म्हारळ परिसरात रोखली. तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना सोडण्यात येत होते. यामुळे माजीवडा ते साकेत येथील दोन्ही मार्गावर वाहतूककोंडी झाली. साकेत पूल परिसरात मोठे खड्डे पडल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडल्याचे दिसून आले, तसेच आनंदनगर येथून काही अवजड वाहनांना सोडल्याने या मार्गावर वाहतूककोंडी झाली. शीळफाटा येथे महापेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची तपासणी तसेच वाहनांचा भार येथील मार्गावर आल्याने दहीसर मोरी ते मुंब्रा शीळफाटा मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नवी मुंबई परिसरात अनेक खासगी कंपन्यांची कार्यालये आहेत, त्यामुळे सकाळी कामानिमित्त जाणाऱ्यांचे मात्र यामध्ये हाल झाले.