बाळानो,आई,बाबा व गुरु हेच तुमचे तारणहार आहेत ; मुख्याध्यापक यशवंत शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 03:52 PM2018-09-18T15:52:06+5:302018-09-18T16:07:08+5:30
मुख्याध्यापक यशवंत शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
ठाणे : ईश्वराचे दुसरे नाव म्हणजे आई.म्हणून म्हणतो बाळांनो, आई,बाबा व गुरु ही त्रिमूर्तीच तुमची तारणहार आहे, असे मनोगत ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी मराठी माध्यम स्कूलचे मुख्याधापक यशवंत शिंदे यांनी व्यक्त केले.
श्री आनंद भारती समाज, ठाणे या संस्थेच्या वतीने श्री आनंद भारती समाज सभागृहात १०८ व्या श्री गणेश उत्सवाचे आयोजन करण्यांत आले आहे.त्या अंतर्गत आयोजित केलेल्या शिक्षण समारंभात यशवंत शिंदे प्रमुखपाहुणे म्हणून गुणवंत - यशवंत विध्यार्थाना मार्गदर्शन करताना बोलत होते. ते म्हणाले कि, शिक्षणप्रेमी गुरु कै. दगडू नाखवा व शिक्षणाचा गुरूने दिलेला वसा कायम ठेवणारे त्यांचे शिष्य कै.यशवंत नाखवा या गुरु-शिष्याची शिक्षण प्रेमाची जिवंत साक्ष म्हणजे श्री गणेश उत्सवात संपन्न होणार आजचा ६७ वा नाखवा स्मारक वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितारण सोहोळा. आपल्या बारा शाखांच्या माध्यमातून गेली १०८ वर्षे श्री आनंद भारती समाज ही सेवाभावी - शतायुषी संस्था कार्यरत आहे.बाळांना प्रेरणा देत त्यांच्या सर्वांगीण विकासाठी संस्था कटिबद्ध आहे. विशेष अतिथी म्हणून बोलताना मर्चंट नेव्हीतील कॅप्टन (निवृत्त) व कर्जतच्या अँनग्लो ईस्टर्न मेरीटाइम अकॅडमिचे डीन जयराज नाखवा म्हणाले कि आजचा पाल्य गुगल गुरूच्या पूर्ण आहारी गेला आहे.त्यांच्या हातातील मोबाईल काढून घ्या.तुमची योग्यता वाढावा. त्यासाठी पालकांनी किमान एक तास पाल्याला देणे गरजेचे आहे. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व समारंभाचे अध्यक्ष रमाकांत कोळी,कार्याध्यक्ष हरेश्वर मोरेकर,उपाध्यक्ष प्रकाश ठाणेकर,दहाव्वी शालान्त परीक्षेत ९७.८० टक्के गुण संपादन करणारा यशवंत नाखवा पारितोषिक विजेता पल्लव साठे,याच परीक्षेत ८३.६० टक्के गुण संपादन करून दगडू नाखवा पारितोषिक विजेती सिध्दीका तांडेल व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यवाह संदीप कोळी यांनी अहवाल वाचन केले तर सहकार्यवाह माधुरी कोळी यांनी सलग तेराव्या वर्षी सूत्रसंचालन केले.प्रणय कमळे व तन्वी शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.डॉक्टर श्रद्धा कोळी हिने ६७ पारितोषिक विजेत्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सत्काराला उत्तर दिले. विध्यार्थी, पालक,सभासद व हितचिंतकांचा उत्तम प्रतिसाद या समारंभास लाभला. शेवटी हरेश्वर मोरेकर यांनी आभार प्रदर्शन केले.