औषधाच्या ओव्हरडोसमुळे झाला बाळाचा मृत्यू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 03:14 AM2019-12-24T03:14:50+5:302019-12-24T03:15:02+5:30
मोहने येथे डॉक्टरला मारहाण : नातेवाइकांनी घातला रुग्णालयात गोंधळ
कल्याण : सर्दी, खोकल्याने त्रस्त असलेल्या दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना मोहने येथे घडली. डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मुलाच्या नातेवाइकांनी डॉक्टरला मारहाण केली. रुग्णालय प्रशासनाने नातेवाइकांचे आरोप फेटाळले.
कल्याणजवळील मोहने परिसरात राहणाऱ्या नोमान काजी यांचा दोन महिन्यांचा मुलगा शहझीन याला सर्दी, खोकला आणि कफचा त्रास झाला. त्यामुळे, पश्चिमेतील श्रीदेवी रुग्णालयात सोमवारी सकाळी काजी आपल्या मुलाला घेऊन आले. तेथे उपस्थित डॉक्टरांनी शहझीन याला तपासल्यावर औषध दिले. मात्र, शहझीन याला घरी नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
ओव्हरडोस दिल्याने शहझीनचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला. तसेच डॉक्टरला मारहाण करत कारवाईची मागणी केली. मुलाची परिस्थिती पाहिल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, मुलाचे नातेवाईक त्यासाठी तयार नव्हते. तसेच, डॉक्टरने कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा केला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. डॉक्टरला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारीची नोंद केली असून, मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. अहवाल आल्यानंतर पुढील तपास करणार असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांनी दिली.