बचत गट मेळावा फ्लॉप शो : महापौरांना महिलांचा घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 03:16 AM2018-12-27T03:16:27+5:302018-12-27T03:17:18+5:30
केडीएमसीच्या जिल्हास्तरीय महिला बचत गट मेळाव्याला योग्य प्रकारे प्रसिद्धी न मिळाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
डोंबिवली : केडीएमसीच्या जिल्हास्तरीय महिला बचत गट मेळाव्याला योग्य प्रकारे प्रसिद्धी न मिळाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या महिलांनी कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे यांना मंगळवारी रात्री घेराव घालून नुकसानभरपाईची मागणी केली. यावरून ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडासंकुलात महिला व बालकल्याण समितीतर्फे झालेल्या या मेळाव्याची मंगळवारी सांगता झाली.
सुरुवातीला हा मेळावा राज्यस्तरीय करण्याचा मानस होता. मात्र, निधीची अडचण आल्याने हा मेळावा जिल्हास्तरीय करून ३५ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली. या मेळाव्यात महिला बचत गटांना मोफत स्टॉल उपलब्ध करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी स्थायी समितीत ठराव मांडून २५० स्टॉलना परवानगी देण्यात आली होती. प्रत्यक्षात १५५ स्टॉल लावण्यात आले. कपडे, लोणची, गूळ, पापड, पिशव्या, कार्पेट अशा विविध वस्तूंचे स्टॉल या मेळाव्यात लावण्यात आले होते.
बचट गटांचा हा मेळावा दोनदा पुढे ढकलण्यात आल्याने आधीपासूनच गोंधळाचे वातावरण होते. अखेर, रविवारी मेळाव्याला मुहूर्त मिळाला, पण नागरिकांनीच पाठ फिरवल्याने काही बचत गटांनी विक्रीसाठी आणलेला नाशवंत माल खराब झाला. तसेच खास या मेळाव्यासाठी तयार केलेले पदार्थ पडून राहिल्याने माल संपवायचा कसा, हा प्रश्न बचत गटांसमोर उभा राहिला आहे. तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉलधारकांना हे पदार्थ फेकून द्यावे लागले. या नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून मंगळवारी रात्री विनीता राणे यांना महिलांनी घेराव घातला.
या मेळाव्यात निवडक ७२ बचत गटांना देण्यात येणारे अनुदानही मिळालेले नाही. तसेच मेळाव्यात मनोरंजनपर कार्यक्रमांवर निधीची उधळपट्टी करण्यात आली. या कार्यक्रमांवर किती पैसे खर्च झाले, हे विचारले असता केडीएमसीचे जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर व बालकल्याण समितीच्या दीपाली पाटील यांनी आकडेवारी सांगण्यास नकार दिला.
ओम गुरुदत्त महिला मंडळाचे नितीन अडसूळ म्हणाले की, क्रीडासंकुलाच्या जवळच एक महोत्सव सुरू असल्याने नागरिकांनी तेथे गर्दी केली होती. मेळाव्याची योग्य प्रकारे जाहिरातच केली न गेल्याने नागरिकांनी पाठ फिरवली. या मेळाव्यातून खर्च सोडाच आमचे रिक्षाभाडेही निघाले नाही. खाद्यपदार्थ रस्त्यावर फेकून द्यावे लागले.
आशा सुर्वे यांनी सेंद्रिय गूळविक्रीचा स्टॉल लावला होता. लोक दुसऱ्या महोत्सवाला तिकीट काढून जातात, मग पालिकेच्या मोफत असलेल्या या मेळाव्याला सहज आले असते. पण, या मेळाव्याच्या प्रसिद्धीत कमतरता राहिल्याने हा फ्लॉप शो झाल्याचे सुर्वे यांनी सांगितले. सुनीता कोकरे, संजीवनी जाधव यांनीही हीच भावना व्यक्त केली. जाधव यांनी वैयक्तिकरीत्या स्टॉल लावला होता.
समितीला अंदाजपत्रक ात नऊ कोटींचा निधी देण्यात आला होता. त्यापैकी एक कोटी खर्च झाले. तसेच बरेचसे उपक्रम हे शेवटच्या टप्प्यात करण्यात आले असून या कामांसाठी सतत पाठपुरावा करावा लागला. - दीपाली पाटील, सभापती,
महिला व बाल कल्याण समिती
मेळाव्याची माहिती देणारे बॅनर शहरात लावण्यात आले होते. तसेच प्रसिद्धिमाध्यमांद्वारेही या उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली होती. मेळाव्याच्या केलेल्या जाहिरातीत केवळ मेळावा एवढाच उल्लेख असल्याने नागरिकांचा प्रतिसाद लाभला नाही, असे बचत गटांचे म्हणणे असून प्रदर्शन आणि विक्री असा आवश्यक होता.
-प्रसाद ठाकूर, जनसंपर्क अधिकारी, केडीएमसी