महापालिकेचा कारभार देवभरोसे?, पूर्णवेळ आयुक्त देण्याची बच्चू कडूंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 05:01 PM2021-04-21T17:01:52+5:302021-04-21T17:09:12+5:30
उल्हासनगरात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असतांना गेल्या वर्षी आयुक्त म्हणून डॉ राजा दयानिधी यांची नियुक्ती झाली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोना काळात देशातील सर्वाधिक घनतेच्या शहराला प्रभारी नव्हेतर, पूर्णवेळ आयुक्त देण्याची मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नगरविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. आयुक्तासह उपायुक्त यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते सुट्टीवर असून प्रभारी आयुक्त पदाचा पदभार भिवंडी महापालिकेच्या आयुक्तांकडे दिला आहे.
उल्हासनगरात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असतांना गेल्या वर्षी आयुक्त म्हणून डॉ राजा दयानिधी यांची नियुक्ती झाली. सुरवातीला कोविड रुग्णालय, आरोग्य केंद्र यांच्यासह आरोग्य विभागाकडे त्यांनी जातीने लक्ष दिल्याने, रुग्ण संख्या कमी झाली. दरम्यान महापालिका कारभार हाताळताना त्यांचा बहुतांश नगरसेवक, पत्रकार व नागरिक यांच्या सोबत सवांद तुटल्याचा आरोप झाला. एका वर्षांपासून पत्रकारां सोबत सवांद न साधता व भेट न दिल्याने पत्रकारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार कायम ठेवला. तसेच महापालिका कारभारात सावळागोंधळ उडल्याची टीका सर्वस्तरातून होऊ लागली. महापालिकेला कॅबिन आयुक्त नव्हेतर, शहरविकासासाठी आयुक्त हवा. अशी मागणी मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री यांच्याकडे सामाजिक संस्थेसह राजकीय पक्षाच्या नेते व नगरसेवकांनी केली आहे.
उल्हासनगरात शेजारील शहरा पेक्षा कोरोनाची संख्या कमी असतांना, त्याप्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आले. याच दरम्यान आयुक्त सुट्टीवर गेल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका झाली. महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह थेट मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्याकडे साकडे घातल्याने, ऑक्सिजनसह इतर आरोग्य सुविधा मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. महापालिकेचा कारभार सांभाळणाऱ्या अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांच्या पाठोपाठ महापालिका सेवेत रुजू झालेल्या आयुक्तांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने, ते सुट्टीवर आहेत. सुदैवाने सोमवार पासून अतिरिक आयुक्त करुणा जुईकर महापालिका सेवेत रुजू झाल्याने, महापालिका कारभार रुळावर आला. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे आयुक्त डॉ राजा दयानिधी बाबत असंख्य तक्रारी गेल्यावर त्यांनी नगरविकासमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आयुक्त बदलीची लेखी मागणी केली.
आयुक्तांची बदली थांबवते कोण?
महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या कारभारावर सर्वस्तरातून टीका होत असून त्यांच्या बदलीची वारंवार आवाई उठविण्यात जाते. तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनी, त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे बदलीची मागणी केली. असे असतांना आयुक्तांची बदली थांबवते कोण? अशी चर्चा शहरात रंगली आहे.