बदलापुरातील बाप्पा चालले मॉरिशसच्या प्रवासाला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 12:09 AM2019-07-22T00:09:09+5:302019-07-22T06:12:43+5:30
समुद्रमार्गे पाठवण्याची व्यवस्था : ४0 दिवसांचा प्रवास करणार, मूर्तींच्या मागणीत वाढ
बदलापूर : बदलापुरातील ख्यातनाम आंबवणे बंधू यांच्या गणेश कलाकेंद्रातील गणरायाच्या मूर्ती यंदाही समुद्रमार्गे मॉरिशसला जाणार आहेत. सण आणि उत्सवानिमित्त नागरिकांनी एकत्र यावे, या भावनेतून मॉरिशस येथेही गणेशोत्सवाची संकल्पना पुढे आली. या उत्सवासाठी १५ वर्षांपासून गणरायाच्या मूर्ती गणेशोत्सवापूर्वी ४० दिवस आधी मॉरिशस प्रवासासाठी रवाना केल्या जातात, अशी माहिती मूर्तिकार उल्हास आंबवणे आणि समीर आंबवणे यांनी दिली.
बदलापूर, अंबरनाथ येथे दरवर्षी किमान पाच हजार मूर्तींची मागणी असते. ठाणे, मुंबई, रायगड जिल्हा, तसेच महाराष्ट्राबाहेर गुजरात, दिल्ली, भोपाळ, कोलकाता, राजस्थान येथेही आंबवणे यांच्या गणेश कलाकेंद्रातील गणरायांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मॉरिशस येथे गेल्या १५ वर्षांपासून गणेशमूर्ती पाठवण्यास सुरु वात केली आहे. २०१५ साली पूर आल्याने गणेशमूर्ती मॉरिशसला जाऊ शकल्या नव्हत्या. मात्र, तेवढा अपवाद वगळता दरवर्षी मूर्तींच्या मागणीत वाढ होत आहे.
यंदा जवळपास ३५० मूर्ती मॉरिशससाठी ४० दिवसांच्या प्रवासाला बुधवारी निघणार आहेत. यासाठी आंबवणे यांची केंद्रातील कारागिरांसह दिवसरात्र लगबग सुरू आहे. गणेशमूर्ती जहाजाने पाठवल्या जातात. बदलापूर ते मॉरिशस जलप्रवासाला ४० दिवसांचा अवधी लागतो. एका मोठ्या कंटेनरमध्ये मूर्ती सुरक्षित पोहोचाव्यात, यासाठी विशेष काळजी घेत पॅकिंग केले जाते. यंदा गणेशमूर्तींमध्ये लालबागचा राजा, पुण्याचा दगडूशेठ आणि चिंतामणी गणेशमूर्तीची मागणी आहे. याशिवाय, मूर्तीच्या रंगसंगतीतही थोडा बदल केला जातो.
देवीच्या मूर्तीही जाणार सातासमुद्रापार
यावर्षी मेटॅलिक आणि रेडियम रंगांना पसंती देण्यात आली आहे. शाडूच्या मूर्तींची मागणी वाढत असून, शाडूच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे उल्हास आंबवणे यांनी सांगितले. गणेशमूर्तींबरोबर नवरात्रोत्सवासाठीदेखील देवीच्या मूर्तींची मागणी मॉरिशस येथून करण्यात आली आहे. सहा ते सात देवीच्या मूर्तीसुद्धा गणरायांबरोबर मॉरिशस प्रवासासाठी निघणार आहेत.