दुसऱ्या कटआॅफमध्ये ठाण्याची कॉलेज मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:35 AM2017-07-21T03:35:49+5:302017-07-21T03:35:49+5:30
अकरावी प्रवेशाची दुसरी कट आॅफ लिस्ट बुधवारी रात्री उशिराने आॅनलाइन प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या यादीच्या तुलनेत ठाण्यातील प्रमुख महाविद्यालयांचा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अकरावी प्रवेशाची दुसरी कट आॅफ लिस्ट बुधवारी रात्री उशिराने आॅनलाइन प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या यादीच्या तुलनेत ठाण्यातील प्रमुख महाविद्यालयांचा कट आॅफ दुसऱ्या यादीत घसरला आहे. पहिल्या यादीत मात्र, कट आॅफबाबतीत मुंबईतील महाविद्यालयांच्या बरोबरीने ठाण्यातील महाविद्यालये होती.
विविध कारणास्तव अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया लांबली, तर पहिली कट आॅफ लिस्टही दिलेल्या वेळेपेक्षा उशिराने प्रसिद्ध झाली. त्यामुळे जाहीर केल्यानुसार दुसरी कट आॅफ तरी गुरुवारी सायंकाळी वेळेवर प्रसिद्ध होते का, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, शिक्षण विभागाने दुसरी कट आॅफ लिस्ट वेळेआधी अर्थात बुधवारी रात्री प्रसिद्ध केली. वेळेआधी प्रसिद्ध केलेल्या यादीनेही काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. दुसऱ्या यादीनुसार ठाण्यातील महाविद्यालयांत विज्ञान शाखेत बांदोडकर महाविद्यालयाचा कट आॅफ सर्वाधिक म्हणजे ९०.२ टक्के इतका आहे. ठाण्यातील केवळ बांदोडकर महाविद्यालयाचाच कट आॅफ दुसऱ्या यादीतही मुंबईतील महाविद्यालयांच्या जवळपास स्थिरावलेला दिसतो. त्या खालोखाल उल्हासनगरचे सीएचएम महाविद्यालय ८९.६ टक्के, बिर्ला महाविद्यालय ८८.२ टक्के, पेंढरकर महाविद्यालयाचा ८४.२ टक्के, तर ज्ञानसाधना महाविद्यालयाचा ७५.६ टक्के कट आॅफ आहे. वाणिज्य शाखेत ८६.८ टक्क्यांसह ठाण्यात बेडेकर महाविद्यालयच सरस ठरले असले तरी मुंबईतील नामांकित ८ महाविद्यालयांचा कट आॅफ यापेक्षा अधिक आहे. बेडेकरखालोखाल सीएचएमचा कट आॅफ ८० टक्के आहे. पहिल्या लिस्टच्या तुलनेत दोन्ही महाविद्यालयांच्या कट आॅफमध्ये सुमारे एक टक्क्याचाच फरक दिसतो आहे. बिर्लाचा कट आॅफ ७९.४ टक्के, तर पेंढरकरचा ७७ टक्के इतका आहे. कला शाखेच्या कट आॅफमध्ये सरासरी ४-५ टक्क्यांची घसरण झाली आहे. ठाण्यात के.जी. जोशी महाविद्यालयाचा कट आॅफ सर्वाधिक म्हणजे ७४ टक्के इतका आहे. जोशी महाविद्यालयापेक्षा मुंबईतील सुमारे ९ महाविद्यालयांचा कट आॅफ जास्त आहे. बिर्ला महाविद्यालयाचा ६५.८ टक्के, पेंढरकरचा ६४.४ टक्के तर सीएचएमचा ५५.६ टक्के इतका कट आॅफ आहे.