हवामानाने फिरवली पाठ, बाजारभावाने लावली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:40 AM2021-03-26T04:40:22+5:302021-03-26T04:40:22+5:30
भातसानगर : शहापूर तालुक्यातील कारले उत्पादनाला बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला असून या हवामानामुळे उत्पन्नात घट झाली आहे. त्यातच ...
भातसानगर : शहापूर तालुक्यातील कारले उत्पादनाला बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला असून या हवामानामुळे उत्पन्नात घट झाली आहे. त्यातच बाजारभावानेही वाट लावली असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील शेंद्रूण गावातील शेतकरी प्रदीप भोईर या शेतकऱ्याने आपल्या एक एकर जागेमध्ये कारल्याचे ठिबक पद्धतीने उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. मागील वर्षी ४० ते ४५ रुपये किलो भावाने ती विकली जात होती. तर काही दिवसांपूर्वी तोच भाव होता, मात्र सद्य:स्थितीमध्ये ही कारली केवळ २० ते २५ रुपये किलोने विकावी लागत आहे. परिणामी झालेला खर्च तरी भरून निघेल की नाही असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. मागीलवर्षी प्रमाणे यंदाही आपल्याला अधिक फायदा होईल, अशा प्रकारची आशा भोईर यांना होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान यामुळे वेलींना लागलेली फुले गळून जाणे किंवा करपून जाणे, अधिक फुले न लागणे यामुळे उत्पादन घटू लागल्याने दीड क्विंटल निघणारी कारली आता दिवसाआड क्विंटलच निघत आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे भोईर यांचे म्हणणे आहे.
पदवी परीक्षा पास झाल्यानंतर केवळ नोकरीची अपेक्षा न करता या तरुणाने अशा प्रकारची शेती करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि तो त्यामध्ये उतरला. शेतीत नाना प्रयोग करून यशही मिळविले. मात्र गेल्या काही वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने त्यांची चिंता वाढली आहे.