आघाडी प्रचारामध्ये पिछाडीवर
By admin | Published: October 26, 2015 02:26 AM2015-10-26T02:26:24+5:302015-10-26T02:26:24+5:30
केडीएमसीच्या निवडणूक प्रचाराला आता वेग आला असला, तरीही सेना-भाजप, मनसेव्यतिरिक्त त्यात फारसा कोणीही जोर धरलेला नाही.
अनिकेत घमंडी, डोंबिवली
केडीएमसीच्या निवडणूक प्रचाराला आता वेग आला असला, तरीही सेना-भाजप, मनसेव्यतिरिक्त त्यात फारसा कोणीही जोर धरलेला नाही. आघाडीच्या राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये नेमके बंडखोर कोणाचे, यावरून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्यामुळे प्रचारात त्यांच्या उमेदवारांची पिछाडी असल्याचे दिसून येत आहे. भाजपने मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची फौज, तर शिवसेनेने सिने-नाट्य कलाकारांची फौज प्रचाराला आणली. मनसेनेही पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनाच येथे आणले. मात्र, काँग्रेससह राष्ट्रवादीने मात्र कोणतेही मातब्बर नेते येथे न उतरवल्याने या पक्षांचे नेमके अस्तित्व आहे की नाही, अशी चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्र्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून कल्याण ग्रामीणमध्ये, तसेच डोंबिवलीत जिमखाना येथे सभा घेतल्या आहेत, तर पंकजा मुंडे यांनीही या ठिकाणी येऊन उमेदवारांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेनेही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठिकठिकाणच्या प्रचार कार्यालयांचा शुभारंभ केला. काँग्र्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र आपापल्या पद्धतीनेच कार्यालये, रॅली, चौकसभा कराव्या-उरकाव्या लागत आहेत. इंदिरानगर, पाथर्ली परिसरात प्रचंड रस्सीखेच दिसून येत आहे. डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक मंदावली असून, त्यांची धडधड वाढवण्यासाठी पंजाही पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची नावपुरतीच आघाडी दिसते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संबंधित उमेदवारांना आपापल्या परीने कार्यकर्ता फळी तयार करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. एकमेकांवर अवलंबून राहू नका, असाही सल्ला देण्यात आल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.
कल्याण ग्रामीणमध्ये तर उमेदवारच दिलेले नसल्याने, त्या ठिकाणी या दोन्ही पक्षांचा प्रचार संपुष्टात आल्यातच जमा आहे. यांनी संघर्ष समितीला पाठिंबा दिल्याने तेथे पक्षस्तरावर अर्ज न भरल्याचे काँग्र्रेस नेतृत्वाने सांगितले.